राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार; ७५% उपस्थिती बंधनकारक नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 06:01 PM2021-02-03T18:01:34+5:302021-02-03T18:01:48+5:30
उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली महत्त्वाची घोषणा
मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरू होणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची घोषणा केली. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयं सुरू करण्यात येतील. यंदाच्या वर्षी ७५ टक्के उपस्थितीचं बंधन नसेल, अशी महत्त्वाची माहिती सामंत यांनी दिली.
राज्यातील महाविद्यालयात सुरू करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून काही दिवसांपासून केली जात होती. यासंदर्भात काही बैठकादेखील पार पडल्या. त्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत महाविद्यालयं सुरू करत असल्याची घोषणा केली. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालयं सुरू करण्यास परवानगी दिली आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयं सुरू करण्यात येणार आहेत, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
Colleges In Maharashtra to re-open with 50% occupancy from 15th February, rule of minimum 75% attendance to be waived off for this year: Uday Samant, Higher and Technical Education Minister of Maharashtra
— ANI (@ANI) February 3, 2021
(File photo) pic.twitter.com/Jy1rSJRzfT
सध्या ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरू केले जातील. तसंच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय खुले असतील. महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक नसेल. मात्र महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना शासनानं घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करावं लागेल, असं सामंत म्हणाले.
युजीसीनं घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्य सरकारनं महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जे विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकत नाही, त्यांना ऑनलाइन क्लासेसचा पर्याय उपलब्ध असेल, असं उदय सामंत यांनी सांगितलं.