जागा भरण्यासाठी महाविद्यालयांची कसरत; सर्वांना मिळणार प्रवेश
By admin | Published: June 28, 2016 04:00 AM2016-06-28T04:00:40+5:302016-06-28T04:00:40+5:30
अकरावीच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेनंतरही सुमारे ४७ हजार ६४८ जागा रिक्त राहण्याची भीती मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाने व्यक्त केली
मुंबई : अकरावीच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेनंतरही सुमारे ४७ हजार ६४८ जागा रिक्त राहण्याची भीती मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाने व्यक्त केली आहे. यंदा अकरावी आॅनलाईन प्रवेशासाठी एकूण २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र मुळात अकरावी प्रवेशासाठी मुंबईतील महाविद्यालयांमध्ये २ लाख ६९ हजार १७२ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे अकरावीच्या सुमारे ४७ हजार ६४८ प्रवेशाच्या जागा यंदाच्या शैक्षणिक वर्षात रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे सर्व विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळणार, ही पालकांसाठी आनंदाची बाब म्हणता येईल. रिक्त जागा भरण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नव्या महाविद्यालयांना विद्यार्थी संख्या भरण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.
कोट्यातील ४३,४९९ जागा समर्पित
अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईनच्या १ लाख ४९ हजार ८०८ जागांसोबत इनहाऊस, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन कोट्यातील एकूण १ लाख १९ हजार ३६४ जागा उपलब्ध होत्या. मात्र कोट्यातील एकूण जागांपैकी ४३ हजार ४९९ जागा आॅनलाईनसाठी समर्पित आहेत. समर्पित जागांत इनहाऊसच्या १० हजार ७१७, अल्पसंख्यांकच्या ३१ हजार २० आणि व्यवस्थापन कोट्यातील १ हजार ७६२ जागा आहेत. त्यामुळे आत्ता आॅनलाईनसाठी उपलब्ध जागांची संख्या २ लाख ६९ हजार १७२ इतकी झाल्याचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.
...तर ५० हजार जागा रिक्त
अकरावी प्रवेशासोबतच अनेक विद्यार्थी आयटीआय आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यात कोट्यातून प्रवेश मिळवलेल्या २८ हजार २३७ विद्यार्थ्यांचे नाव आॅनलाईनच्या पहिल्या कट आॅफमध्येही लागले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी प्रवेश घ्यावा लागेल. त्यामुळे अकरावीच्या रिक्त जागांची संख्या ५० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)