एसटी देणार खासगी बस सेवेला टक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 05:36 AM2017-08-07T05:36:19+5:302017-08-07T05:36:57+5:30
सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येन लोक प्रवास करतात. या कालावधीत खासगी लक्झरी बसकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारीही होतात. ही प्रवासी लूट थांबविण्यासाठी आणि एसटीचे भारमान वाढविण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सीएसएमटी आणि क्रॉफर्ड मार्केट येथून एसटी बस सोडण्यासाठी चाचपणी करत आहे.
महेश चेमटे
मुंबई : सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येन लोक प्रवास करतात. या कालावधीत खासगी लक्झरी बसकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारीही होतात. ही प्रवासी लूट थांबविण्यासाठी आणि एसटीचे भारमान वाढविण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सीएसएमटी आणि क्रॉफर्ड मार्केट येथून एसटी बस सोडण्यासाठी चाचपणी करत आहे. खासगी लक्झरी बसला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळातील वातानुकूलित बस येथून सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवादरम्यान कोकण मार्गासह राज्यभरात मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. शहरातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांतील प्रवासी संख्यादेखील लक्षणीय आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी एसटीने तब्बल २ हजार २१६ जादा बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
या जादा बस चालविण्यासाठी या बसच्या फेºयांचे नियोजन सुरू केले आहे. यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट, कुलाबा आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना एसटीच्या प्रवासासाठी मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला गाठावे लागते. त्यात अधिकचा वेळही लागतो, शिवाय सामानाची ओझी बाळगणे जिकिरीचे ठरते. त्यामुळे प्रवासी खासगी लक्झरी बसना प्राधान्य देतात. याचाच फायदा घेत, लक्झरी बस चालकांकडून प्रवाशांची लूबाडणूक होत असल्याच्या घटना घडतात. परिणामी, एसटी प्रशासन खासगी बसला टक्कर देण्यासाठी सीएसएमटी आणि क्रॉफर्ड मार्केट येथून बस सोडण्याच्या पर्यायांची चाचपणी करत
आहे. ही सोय झाल्यास दक्षिण मुंबईतून एसटीने प्रवास
करणाºया प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे.
रहदारी पाहून वेळापत्रक
एसटी प्रशासन सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशेजारील बेस्टच्या आगारातील मोकळ्या जागेतून एसटी सोडण्यासाठी चाचपणी करत आहे. ही एसटी पुणे-सातारा या मार्गावर धावणार आहे. कोकण मार्गातील प्रवाशांसाठी क्रॉफर्ड मार्केट येथूनही एसटी सोडण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या जागेवरील वाहतुकीची रहदारी पाहता, दिवस आणि वेळ निश्चित करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.