कोलमाफिया शागीरचा अखेर मृत्यू

By admin | Published: December 9, 2014 01:00 AM2014-12-09T01:00:46+5:302014-12-09T01:00:46+5:30

कारमध्ये मागे बसलेल्याने गोळी झाडल्यामुळे गंभीर जखमी झालेला शागीर अहमद सिद्दीकी (वय २८) याचा अखेर वोक्हार्टमध्ये मृत्यू झाला. दोन कोटींची सुपारी घेऊन त्याचा सिनेस्टाईल गेम करण्यात

Colmafia Shagir finally died | कोलमाफिया शागीरचा अखेर मृत्यू

कोलमाफिया शागीरचा अखेर मृत्यू

Next

‘सुपारी’ने केला गेम : खुनाचा गुन्हा दाखल
नागपूर : कारमध्ये मागे बसलेल्याने गोळी झाडल्यामुळे गंभीर जखमी झालेला शागीर अहमद सिद्दीकी (वय २८) याचा अखेर वोक्हार्टमध्ये मृत्यू झाला. दोन कोटींची सुपारी घेऊन त्याचा सिनेस्टाईल गेम करण्यात आल्याची सर्वत्र चर्चा आहे. गोळी झाडणारे आरोपी हाताशी असताना गेल्या सहा दिवसात पोलिसांनी ‘सुपारी किलिंग’चे हे गंभीर प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले, ती पद्धत सीताबर्डी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लावणारी ठरली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे की तपासाच्या नावाखाली जाणीवपूर्वक टाईमपास करीत आहे, असाही प्रश्न त्यामुळेच चर्चेला आला आहे.
मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुसचा रहिवासी असलेला शागीर कोळशाच्या काळ्या व्यवहारातून महिन्याला दीड ते दोन कोटींची खंडणी वसूल करीत होता. महिनाभरापूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यापासून तसेच काही गुंडांनी त्याची सुपारी घेतल्याचे कळाल्यापासून शागीर नागपुरात राहायला आला होता. त्याने येथील काही प्रमुख गुन्हेगारांशी संधान साधले होते आणि यातीलच काहींना तो दिवस-रात्र बॉडीगार्ड म्हणून सोबत ठेवत होता. २ डिसेंबरला दुपारी १.२० ते १.२५ च्या सुमारास शागीर आपल्या आॅडी कारमधून (एमएच ४०/ एसी ९७९७) जाकीर खान, शक्ती मनपिया आणि आशिष पारोचे या तिघांसोबत ‘गोकुल’मध्ये आला होता. तेथून नाश्ता घेतल्यानंतर परत जात असताना धरमपेठेतील सुदामा टॉकीजच्या मागे अ‍ॅड. साहिल भांगडे यांच्या कार्यालयासमोर कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या शक्तीने ड्रायव्हिंग सीटच्या हेडसपोर्टरच्या मागून शागीरवर पिस्तुलातून गोळी झाडली. त्यामुळे शागीर गंभीर जखमी झाला. आरोपींनी नंतर त्याला वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
पोलिसच संशयाच्या घेऱ्यात
घटनेच्या तासाभरानंतरच सीताबर्डी पोलिसांनी आरोपी जाकीर, शक्ती आणि आशिषला अटक केली. पीसीआर मिळाल्यामुळे पोलिसांच्या ताब्यात सहा दिवसांपासून आरोपी आहेत. मात्र, या सहा दिवसात पोलिसांनी आरोपींपासून काय वदवून घेतले, याच प्रश्नांचा तपास करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात सीताबर्डीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा करून अधिकारी वेळोवेळी विसंगत माहिती देतात. शागीरची हत्या सुपारी घेऊन करण्यात आल्याचे पोलीस सांगतात. मात्र, सुपारी कुणी दिली आणि कुणी घेतली, ते सांगायला तयार नाहीत. सुपारी किती रुपयांची आहे (गुन्हेगारी वर्तुळात दोन कोटींपासून १० कोटींपर्यंतची चर्चा आहे) त्याची माहिती मिळाली नसल्याचे पोलीस म्हणतात. ज्याच्या भरवशावर शक्ती, जाकीर आणि आशिष गेल्या अनेक दिवसांपासून ऐषोआराम भोगत आहेत, त्या शागीरचा गेम त्यांनी कुणाच्या इशाऱ्यावरून केला, ते स्पष्ट झालेले नाही. सीडीआर काढत आहो, नातेवाईकांकडे विचारपूस सुरू आहे, अशी जुजबी माहिती पोलीस सांगत आहेत.
काय मिळवले पोलिसांनी?
‘पॉवरफूल गुन्हेगाराने’ ही सुपारी घेतली अन् सीताबर्डीच्या एकाशी तो संपर्कात असल्याची गुन्हेगारी वर्तुळात चर्चा आहे. ती ध्यानात घेता पोलिसांनी गेल्या सहा दिवसात तपासाच्या नावाखाली केलेला ‘टाईमपास’ सीताबर्डी पोलिसांवर संशय निर्माण करणारा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Colmafia Shagir finally died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.