साताऱ्याचे कर्नल महाडिक सीमेवर शहीद
By admin | Published: November 18, 2015 04:13 AM2015-11-18T04:13:38+5:302015-11-18T04:13:38+5:30
पाकिस्तानातून येऊन जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील जंगलात लपलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या संशयित अतिरेक्यांना हुसकावून लावताना भारतीय लष्कराचे कर्नल संतोष
श्रीनगर : पाकिस्तानातून येऊन जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील जंगलात लपलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या संशयित अतिरेक्यांना हुसकावून लावताना भारतीय लष्कराचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग आॅफिसर असलेले कर्नल महाडिक सातारा जिल्ह्यातील आहेत.
अतिरेक्यांची एक तुकडी ३० व ३१ आॅक्टोबर दरम्यानच्या रात्री कुपवाडा जिल्ह्यात हैहामा येथे सीमा ओलांडून भारतात घुसली. परंतु पाऊस व बर्फवृष्टीमुळे ती जंगलातच अडकून पडली होती. या अतिरेक्यांना हुसकावून लावण्याची मोहीम लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सची तुकडी व काश्मिरच्या विशेष पोलीस दलाने १३ नोव्हेंबरपासून हाती घेतली होती. या तुकडीचे नेतृत्व कर्नल महाडिक यांच्याकडे होते. अतिरेक्यांचा पाठलाग करत लष्करी जवान व पोलिसांची तुकडी मंगळवारी सीमेलगतच्या हाजी नाका येथील दाट जंगलात शिरली तेव्हा अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात कर्नल महाडिक व मजलून अहमद यांच्यासह आणखी एक पोलीस जखमी झाला. कर्नल महाडिक व इतर दोघा जखमींना हेलिकॉप्टरने श्रीनगर येथे १५ कॉर्पस्च्या लष्करी कमांड इस्पितळात आणण्यात आले. परंतु कर्नल महाडिकांचे प्राण वाचू शकले नाहीत. (वृत्तसंस्था)