कर्नल महाडिक यांचे पार्थिव साताऱ्यात
By admin | Published: November 19, 2015 12:18 AM2015-11-19T00:18:16+5:302015-11-19T00:39:21+5:30
पोगरवाडीत आज अंत्यसंस्कार : गोडोलीतील निवासस्थानी शोकाकुल सातारकरांची रीघ
सातारा : काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांचे पार्थिव बुधवारी रात्री उशिरा साताऱ्यात दाखल झाले आणि कुटुंबीयांसह मित्रमंडळींनी टाहो फोडला. पोगरवाडी (ता. सातारा) या महाडिक यांच्या जन्मगावी आज, गुरुवारी सकाळी महाडिक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कर्नल संतोष महाडिक (घोरपडे) हे कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांची शोधमोहीम सुरू असताना शहीद झाल्याचे वृत्त समजल्यापासूनच सातारा येथील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. बुधवारी दिवसभर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पार्थिव पुण्यातून निघण्यास रात्रीचे आठ वाजले. कर्नल संतोष महाडिक यांच्या मातोश्री, बहीण आणि कुटुंबातील महिलांच्या डोळ्यांतील धारा थांबत नव्हत्या. कर्नल संतोष यांना दत्तक घेणारे त्यांचे १०४ वर्षांचे आजोबा हे वृत्त ऐकून सुन्न झाले होते. पुण्याहून पार्थिव येण्याची वेळ लांबत गेली तसतसा नातेवाइकांच्या संयमाचा बांध क्षीण होत गेला. हंबरडे आणि सांत्वनाचे शब्द यांनी गोडोली येथील त्यांच्या घराचा परिसर व्यापून गेला होता.
स्थानिक पोलीस, अधिकारी आणि कर्मचारी अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात गुंतले होते. घराबाहेरील छोट्याशा अंगणात फुलांनी सजवलेले टेबल ठेवण्यात आले होते. आजूबाजूच्या इमारतींच्या टेरेसवरही प्रचंड गर्दी झाली होती. आजूबाजूला हॅलोजन लावून परिसर प्रकाशमय करण्यात आला होता. गोडोली नाका ते रहिमतपूर या मुख्य रस्त्यापासून कर्नल महाडिक यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. एकाचवेळी शोक आणि अभिमान अशा संमिश्र भावना चेहऱ्यावर घेऊन नागरिक परिसरात तासन्तास उभे राहिले होते.
रात्री १०.३५ च्या सुमारास पार्थिव गोडोली येथील निवासस्थानी आले. पार्थिवासोबत पालकमंत्री विजय शिवतारे होते. कुटुंबीय आणि इतर नातेवाइकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर अन्य नागरिकांना अंत्यदर्शनासाठी सोडण्यात आले.
यावेळी आमदार शिवेंद्रसिंह राजे, जिल्हाधिकारी अश्विनी मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, नगराध्यक्ष विजय बडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित बापट यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सुमारे दोन तास नागरिकांसाठी पार्थिव त्याच ठिकाणी ठेवण्यात आले. आज, गुरुवारी सकाळी लवकर पार्थिव पोगरवाडीला नेण्यात येईल. तेथे संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. (प्रतिनिधी)
पार्थिव पाहताच आक्रोश
रात्री उशिरा पार्थिव घेऊन येणारा मोटारींचा ताफा महाडिक यांच्या निवासस्थानी पोहोचताच गगनभेदी हंबरड्यांनी परिसर व्यापून टाकला. पोलिसांनी सर्व प्रथम कुटुंबीयांना अंत्यदर्शन घेता यावे म्हणून अंगणाच्या बाहेर अडथळे लावले होते. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस सातत्याने झटत होते. कुटुंबीयांनी कर्नल महाडिक यांचे पार्थिव पाहताच केलेला आक्रोश उपस्थितांच्या काळजाला घरे पाडणारा होता.
महाडिक यांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्य शासन उचलणार : मुख्यमंत्री
शहीद संतोष महाडिक यांच्या पार्थिवाचे पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शहीद महाडिक यांच्या कुुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी राज्य शासन उचलणार असल्याचे सांगितले.