रोडपालीतील खाडीचा रंग बदलला
By admin | Published: January 18, 2017 03:07 AM2017-01-18T03:07:34+5:302017-01-18T03:07:34+5:30
तळोजा एमआयडीसीमधील रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीत सोडले जाते.
अरुणकुमार मेहत्रे,
कळंबोली- तळोजा एमआयडीसीमधील रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीत सोडले जाते. हे पाणी रोडपालीला खाडीला मिळते. त्यामुळे खाडीचा काही भाग पूर्णपणे काळा झाला असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
प्रदूषित पाण्यामुळे मँग्रोज, मासे तसेच जलचरांवर परिणाम होत आहे. याबाबत प्रदूषण महामंडळाकडे वारंवार तक्र ार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. येथील काही कारखाने रसायनमिश्रित पाणी सीईटीपीला न देता पावसाळी नाल्यात सोडतात. ते पाणी पाताळगंगा नदीला जावून मिळते. काही कारखाने थेट नदीपात्रात सांडपाणी सोडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. वादाच्या भोवऱ्यात असलेले औद्योगिक सांडपाण्यावरही शास्त्रशुध्द पध्दतीने प्रक्रि या न करता ते कामोठे खाडीत सोडले जाते. यात घातक रसायने असल्याने उग्र वास येतो. यामुळे रोडपालीत राहणाऱ्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तळोजा-लिंक रोडवर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनाही या दुर्गंधीचा त्रास होऊ लागल्याचे येथील रहिवासी सुनील गोतपगार यांनी सांगितले. टोलेजंग इमारतीत लाखो रूपयांची गुंतवणूक करून या ठिकाणी घर खरेदी केले. मात्र रात्रीच्या वेळी आपण नेमके एमआयडीसीत राहतो की वसाहतीत असा प्रश्न पडत असल्याची प्रतिक्रिया सागर वीरकर या रहिवाशाने दिली. रोडपाली येथे नवी मुंबई पोलीस मुख्यालय आहे. तिथे जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी काम करतात. त्यांनाही खाडीतून येणाऱ्या उग्र वासाचा त्रास होतो. डोळ्याला चुरचुरणे, डोकेदुखी आदी तक्रारी येत असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांच्याही त्याच तक्र ारी आहेत.
पाताळगंगा नदी व कामोठे खाडीत दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू होत आहे. तसेच पाण्यातील इतर जलचर व वनस्पतींवर परिणाम होतो. रसायनयुक्त पाण्यामुळे सध्या कामोठे खाडी पूर्णपणे काळी झाली आहे. कुठेच पाणी दिसत नाही, चारही बाजूने रसायनाचा तवंग नजरेस पडतोय.
पनवेल-सायन महामार्गावरून जाणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास होतो. कित्येक ठिकाणी मँग्रोज जळालेले दिसते. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघड चालला आहेच. इतकी गंभीर वस्तुस्थिती असतानाही प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याचे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.
।रोडपालीमधील सर्वच रहिवासी उग्र वासाने त्रस्त आहेत. सकाळी धूर, धुके आणि प्रदूषणामुळे तर श्वास घेणेही कठीण जाते. येथील रहिवाशांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही.
- चंद्रकांत राऊत,
अध्यक्ष, रोडपाली एकता सामाजिक सेवा संस्था
सध्या या विभागाचा पदभार माझ्याकडे नाही. रासायनिक सांडपाण्यामुळे पाताळगंगा व कासाडी खाडीचे पाणी प्रदूषित होत आहे. मात्र याबाबत अद्याप तक्रार नाही, काही तक्रारी आल्यास त्याबाबत निवारण करण्यात येईल.
- तानाजी यादव,
उपप्रादेशिक अधिकारी,
प्रदूषण नियंत्रण महामंडळ