आवाजाप्रमाणेच रंगांचे फटाकेही धोकादायक
By admin | Published: October 23, 2016 01:33 AM2016-10-23T01:33:32+5:302016-10-23T01:33:32+5:30
दिवाळीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम दिवाळीवरही दिसत आहे. ‘डाएट फराळा’सह ‘इको-फ्रेंडली’ दिवाळी साजरी करण्याकडेही
दिवाळीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम दिवाळीवरही दिसत आहे. ‘डाएट फराळा’सह ‘इको-फ्रेंडली’ दिवाळी साजरी करण्याकडेही कल दिसून येतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी ‘आम्ही कमी आवाजवाले फटाके आणतो.’ ‘शोभेचे फटाके आणतो, त्यामुळे कोणालाच त्रास नाही’ अशी वाक्ये सर्रास ऐकायला मिळतात. मोठा आवाज करणारे फटाकेच आरोग्यास घातक असतात, हा असाच एक गैरसमज. प्रत्यक्षात शोभेचे, विविध रंगांचे फटाकेही आरोग्यासाठी तेवढेच धोकादायक आहेत. फटाक्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबरोबरच क्षयरोग, न्युमोनिया या विषयांवर ज्येष्ठ श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. जलील परकार यांच्याशी केलेली ‘कॉफी टेबल’ चर्चा... खास दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देत आहोत...
दिवाळीतील फटाक्यांचा आरोग्यावर कितपत परिणाम होतो?
फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणात भर पडते. आपल्याकडे तर दिवाळीनंतरही फटाके फोडले जातात. ते फोडण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. काही देशांमध्ये फटाके फोडण्यासाठीही काही नियमांची चौकट आखून दिलेली दिसून येते. ही नियमावली तंतोतंत पाळली जाते. फटाक्यांमुळे आरोग्यावरील काही परिणाम तत्काळ दिसून येतात, तर काही दीर्घकालीन असतात. फटाक्यांच्या धुरामुळे सर्दी, खोकला होणे, घसा बसणे, घसा खवखवणे हे त्रास तर नित्याचे आहेत. मोठ्या आवाजांच्या फटाक्यांमुळे झोपेचे वेळापत्रक बिघडणे, डोकेदुखी, तसेच हृदयविकार असणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अस्थमा असणाऱ्यांना या काळात अधिक त्रास होतो. अनेकदा या व्यक्तींना आॅक्सिजन देण्याची वेळ येते. त्यांना नेब्युलायझर वापरावा लागतो. या काळात अनेकांना रक्तदाबाचाही त्रास होतो. चिडचिडेपणा वाढतो. आकाशातून फुटून खाली येणाऱ्या फटाक्यांमुळे त्यातील काही विषारी पदार्थ पाण्यात मिसळतात. त्यामुळे हा धोका अधिक वाढत जातो. पक्ष्यांनाही त्याचा त्रास होतो.
वातावरणातील बदल कसे होतात?
दिवाळीच्या दिवसांमध्ये पहाटेनंतरही वेळ धुक्यासारखे दिसते, पण ते धुके नव्हे, तर फटाक्यांच्या वातावरणात जमलेला धूर असतो. यामुळे अपघातांचा धोका वाढण्याचीही भीती असते. फटाके फुटल्याने तापमानात वाढ होते. सामान्यत: व्यक्तीची श्रवण क्षमता ६० डेसिबल असते. मात्र, फटाके फुटल्यावर ९० डेसिबलहून अधिक आवाज होतो. त्यामुळे श्रवणक्षमतेवर याचा परिणाम होतो.
विषारी घटकांचा परिणाम कसा दिसून येतो?
फटाका ‘गन पावडर’मुळे फुटतो. कोळसा, सल्फर आणि पोटॅशियम नायट्रेट यांच्या मिश्रणातून गन पावडर तयार होते. त्यात कार्सेजनिक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण कैकपटीने वाढते. या घटकांचा दुष्परिणाम थायरॉईडवरही होतो. गेल्या काही वर्षांत शोभेच्या फटाक्यांची मागणी वाढली आहे. यात विविध रंगाचे फटाके असतात. फटाका फुटल्यानंतर निर्माण होणाऱ्या हिरव्या रंगात बेलियम रेडिओ अॅक्टिव्ह असते, तर निळ््या रंगात कॉपर कम्पाउंडचा वापर केला जातो. यात असणाऱ्या डायोक्सिनमुळे कर्करोगाचा धोका वाढतो. फटाका फुटल्यावर हवेत अर्सेनिक पसरते. याचा परिणाम मूत्रपिंडावरही होतो. गर्भवती महिलांनाही याचा धोका असतो. यामुळे फटाके उडवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
फटाक्यांचा कचरा कसा धोकादायक ठरतो?
आपल्याकडे फटाके फोडल्यानंतर होणारा कचरा तसाच पडून राहतो. त्याची विल्हेवाट लावली जात नाही. हा कचरा अनेकदा एका ठिकाणाहून दुसरीकडे नेला जातो. त्यामुळे विषारी घटकही पसरत जातात. फटाके फोडल्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची जबाबदारी फटाके फोडणाऱ्यांनी घ्यावी.
धूम्रपानही फटाक्यांएवढेच धोकादायक ठरते?
धूम्रपान करणाऱ्याबरोबरच आजूबाजूच्या व्यक्तींनाही हा त्रास होतो. हे पॅसिव्ह स्मोकिंग त्रासदायक ठरते. सिगारेट ओढल्याने गळ््यात असलेले पातळ आवरण भाजून निघते. पुढेपुढे त्याची सवय होऊन जाते. सिगारेटचा परिणाम तत्काळ दिसून येत नसला, तरी शरीरात मात्र अंतर्गत बदल होतातच. काही वर्षांनी सिगारेट सोडल्यानंतरही कर्करोगाचा धोका पूर्णपणे टळला, असे म्हणता येत नाही. हुक्क्यामुळे कोणताही त्रास होत नाही, हा एक मोठा गैरसमज आहे. त्यात तर फ्लेवर्ड तंबाखू असते. मुंबईत हुक्क्याला असलेली बंदी योग्यच आहे. लोकांनी स्वत:च्या शरीराचा विचार करायला हवा. अन्यथा कितीही जनजागृती केली, तरी त्यामुळे बदल घडणार नाही.
क्षयरोगाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल काय सांगाल?
२० ते २५ वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. त्या वेळी क्षयरोग गरीब वस्तीत राहणाऱ्यांना होणारा आजार म्हणून ओळखला जात असे. बहुतांश रुग्ण निम्न मध्यमवर्गीय असायचे. आता मात्र, परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. श्रीमंत वर्गातही क्षयरोगी मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सातत्याने औषधे घेतल्याने विषाणू दाद देईनासे होतात. क्षयरोगाच्या विषाणूंचेही काहीसे असेच झाले आहे. त्यामुळे मल्टि ड्रग्ज रजिस्टंट टीबी (एमडीआर) क्षयरोग पुढे आला. क्षयरोग बरा होणारा आजार आहे, पण त्यासाठी लवकर निदान आणि योग्य वेळी औषधे घेणे आवश्यक आहे. क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणे आवश्यक आहे. क्षयरोगाला आळा घालण्यासाठी विशेष संशोधन, आकडेवारीचा अभ्यासही होणेही गरजेचे आहे.
हल्ली न्युमोनिया अधिक बळावतोय?
न्युमोनिया आधीही होत होताच, पण सध्या प्रदूषणामुळे हे प्रमाण वाढले आहे. कारमधून प्रवास करताना खिडक्या उघड्या ठेवल्यास घशाला लगेचच त्रास जाणवू लागतो. शहरांमध्ये शुद्ध हवा, आॅक्सिजन मिळणे कठीण होत आहे. ग्रामीण परिसरात अजूनही निसर्ग काही प्रमाणात शाबूत आहे. आपल्याकडे त्याचा अभाव दिसतो. शुद्ध हवा नसल्याने, जीवाणू शरीरात जाऊन ते फुप्फुसांवर परिणाम करतात.
क्षयरोग प्रतिबंधासाठी काय करावे?
क्षयरोगाला प्रतिबंधाचा उत्तम उपाय म्हणजे रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणे. यासाठी सकस आणि योग्य प्रमाणात आहार घ्यायला हवा. जेवणात पोळी, भाजी, आमटी, भात एखादे फळ यांचा समावेश असावा. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहून, सर्व आजार आपोआप दूर राहतात.
वजन कमी करण्यासाठीच्या उपायांमुळे रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो का?
हल्ली डाएटचे फॅड आलेले आहे, पण डाएटची पद्धत चुकीची असते. अनेकदा डाएट करताना ठरावीक पदार्थ खाण्याकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे या व्यक्तींना योग्य प्रमाणात व्हिटॅमिन, प्रथिने मिळत नाहीत. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यांचा संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. शहरी भागातील कार्यालयीन काम करणाऱ्या व्यक्तीला दिवसात १ हजार २०० ते १ हजार ५०० कॅलरीजची आवश्यकता असते, पण सर्वसामान्यपणे ६ ते ७ हजार कॅलरीज घेतली जातात, त्यामुळे वजन वाढत जाते. अशा व्यक्तींनी डाएट करताना काही काळ दीड हजार कॅलरीजच शरीरात जातील, याकडे लक्ष द्यावे. त्यानंतर अधिकच्या कॅलरीज बर्न कराव्यात. त्यानंतरच खऱ्या अर्थाने वजन कमी व्हायला सुरुवात होईल. या सर्व गोष्टींचा शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार व्हायला हवा.
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल?
चांगल्या आरोग्यासाठी जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे आहेत. ग्रामीण परिसरात राहणाऱ्या व्यक्तींना हृदयविकार, रक्तदाब कमी प्रमाणात होतात. त्याला त्यांची साधी जीवनशैली कारणीभूत ठरते. पैसा वाढला की, आजारही बळावताना दिसतात. अनेकदा गरजेपेक्षा अधिक खाल्ले जाते. पूर्वी शेतावर जाणाऱ्या व्यक्ती या भाकरी-चटणी खायचे. त्यांच्या शरीराला गरज असेल, तितकेच खायचे. त्यांना अॅसिडीटी कधी झाली नाही. आपल्याला सुविधा अधिक हव्या असतात. त्यामुळे साधी जीवनशैली स्वीकारण्याची गरज आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे डॉक्टरही म्हणूनही तुम्ही परिचित होतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल?
बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा माणूस मी तरी पाहिलेला नाही. राजकारण, समाजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. प्रत्येक विषयाची त्यांची जाण अफाट होती. ते रोज १८ वर्तमानपत्र न चुकता वाचायचे. ते अत्यंत शिस्तप्रिय होते. प्रत्येक गोष्ट त्यांना जागच्या जागी लागायची. स्मरणशक्तीही त्यांची दांडगी होती. एखाद्या व्यक्तीला ते तीन वर्षानंतर भेटले, तरीही तीन वर्षांपूर्वी काय चर्चा झाली, हे ते अचूक सांगायचे. असा राजकारणी पुुढची अनेक वर्षे होणे नाही.
(मुलाखत- पूजा दामले)