‘जागतिक रंगभूमी दिना’कडे रंगकर्मींची पाठ
By Admin | Published: March 28, 2016 02:26 AM2016-03-28T02:26:14+5:302016-03-28T02:26:14+5:30
राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी ओळख असलेल्या ठाण्यातील रंगकर्मी व नाट्यसंस्थांना आजच्या (२७ मार्च) रोजीच्या जागतिक रंगभूमी दिनाचा साफ विसर पडला.
- स्नेहा पावसकर, ठाणे
राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी ओळख असलेल्या ठाण्यातील रंगकर्मी व नाट्यसंस्थांना आजच्या (२७ मार्च) रोजीच्या जागतिक रंगभूमी दिनाचा साफ विसर पडला. ठाण्यातील रंगकर्मी किंवा नाट्यसंस्थांच्या वतीने कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते. ५ नोव्हेंबर रोजी ‘मराठी रंगभूमी दिन’ थाटामाटात साजरा करणाऱ्या ठाणेकरांची जागतिक रंगभूमी दिनाबाबत मात्र अनास्था दिसून आली.
जगभरात जागतिक रंगभूमी दिन २७ मार्चला साजरा केला जातो. मात्र, रविवारी ठाण्यात त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रम झाले नाहीत. एरव्ही, सण-उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या ठाण्यातील कलाकारांच्या किंवा कोणत्याही संस्थांच्या वतीनेही कार्यक्रम आयोजित केलेला नसल्याने सांस्कृतिक नगरीत शांतता होती. गडकरी रंगायतनमध्ये संपन्न झालेला शिवसोहळा आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील एक नाटकाचा खेळ आणि गाण्यांचा कार्यक्रम हे पूर्वनियोजित होते. मात्र, रंगभूमी दिनाचे औचित्य साधून एकही कार्यक्रम नव्हता. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ठाणे शाखेकडूनही कुठल्याच कार्यक्रमाचे आयोजन नव्हते. ५ नोव्हेंबर हा दिवस आपण ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करतो. त्या दिवशी विविध स्पर्धा घेतल्या जातात. मात्र, आजचा हा ‘जागतिक रंगभूमी दिन’ आपल्याकडे फारसा साजरा केला जात नाही, अशी प्रतिक्रिया ठाणे शाखेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी दिली.
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ठाण्यात एकत्रित कोणताही कार्यक्रम होत नाही, हे खरे असले तरी हा दिवस साजरा करण्याची गरज आहे. पुढील वर्षी कार्यक्रमाचे आयोजन करू, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांनी सांगितले.