बाबूराव.. मी शिवाजी पार्क बोलतोय... ऐका जरा माझंपण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 12:11 PM2022-02-13T12:11:53+5:302022-02-13T12:16:04+5:30
मी शिवाजी पार्क... तुम्ही रोज इथे येता, माझ्याजवळ बसता... तुमची सुख-दु:ख सांगता. मी निमूटपणे ऐकून घेतो. तुम्ही मनानं रिकामं होता आणि घराकडे जाता... मी मात्र तुमच्यासारख्या अनेकांच्या गोष्टी ऐकतोय... वर्षानुवर्षे... मी माझं दु:ख कोणाला सांगणार? परवा आपल्या देशाच्या थोर गायिका लता मंगेशकर गेल्या.
अतुल कुलकर्णी -
रात्रीची निरव शांतता... बाबूराव पायी शिवाजी पार्कात फिरत होते. तेवढ्यात आवाज आला... बाबूराव, कुठं निघालात... बसा माझ्याजवळ... आवाजाच्या दिशेने पाहिले तर कोणीच दिसेना. कुठून आवाज येतोय याचा कानोसा घेताना पुन्हा आवाज आला... सगळे येतात, माझा वापर करतात आणि निघून जातात... मला काय पाहिजे ते कोणीच विचारत नाही... पुन्हा इकडं तिकडं पहात बाबूराव कावरे बावरे झाले.. तर पुन्हा आवाज आला. मी बोलतोय... शिवाजी पार्क माझं नाव... बाबूराव हादरलेच... धक्क्यानं ते एका कठड्यावर मटकन बसलेच... आणि शिवाजी पार्क बाबूरावांशी बोलू लागले...
मी शिवाजी पार्क... तुम्ही रोज इथे येता, माझ्याजवळ बसता... तुमची सुख-दु:ख सांगता. मी निमूटपणे ऐकून घेतो. तुम्ही मनानं रिकामं होता आणि घराकडे जाता... मी मात्र तुमच्यासारख्या अनेकांच्या गोष्टी ऐकतोय... वर्षानुवर्षे... मी माझं दु:ख कोणाला सांगणार? परवा आपल्या देशाच्या थोर गायिका लता मंगेशकर गेल्या. तुमचे थोर उपकार... तुम्ही दीदींचं कलेवर माझ्यापर्यंत आणलंत... माझ्या अंगणातच दीदीवर अग्निसंस्कार केले... दीदींवर अग्निसंस्कार होतानाचा दाह माझं अंग अंग भाजून गेला. मात्र त्या ज्वाळांमधूनही मला दीदींचे मुझे छू रही हैं तेरी गर्म साँसें, मेरे रात और दिन महकने लगे हैं... हे गाणं ऐकायला येत होतं... ते ऐकताना... अंग जळत होतं; पण मन तृप्त होत होतं... मध्यरात्री कोणीही त्या जळणाऱ्या चितेजवळ नव्हतं. तेव्हा मी दीदींना विचारलं... फार भाजलं तर नाही ना... दीदींनी हसत हसत मला सांगितलं... जे जळतंय ते नश्वर शरीर आहे. त्यात मी कुठंय... मी तर तुझ्या अंगाखांद्यावर, उद्या सकाळी फिरत, पळत, खेळत येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आणि गळ्यात आहे... बाबूरावांच्या अंगावर शहारा आला. तसं शिवाजी पार्क पुन्हा बोलू लागलं...
मागेदेखील एका महान व्यंगचित्रकाराचं कलेवर माझ्या इथंच आणलं होतं... बाळासाहेब ठाकरे त्याचं नाव... ते दरवर्षी दसऱ्याला माझ्याकडे यायचे. मला लवून मुजरा करायचे. मला विचाराचं सोनं द्यायचे. त्यांचंही कलेवर रात्री धडधडताना मी विचारलं होतं... त्रास तर होत नाहीय ना... ते मोठे मिश्कील, म्हणतात कसे... अरे मी हिंदुत्वाचा विचार देणाऱ्या प्रखर ज्वाळा पेटवल्या... या असल्या फडतूस ज्वाळा माझं काय वाकडं करणार..? आजही मी अधून मधून त्यांच्याशी गप्पा मारतो... हे काय इथंच तर आहेत ते...
पण आता लताबाईंचं स्मारक इथं करायचं असं कोणी बोलल्याचं मी ऐकलं. नका रे माझं अस्तित्व संपवू... माझा एक इतिहास आहे. माझ्या अंगाखांद्यावर खेळून अनेक मुलं देशात, जगात नाव कमावती झाली. अनेकांनी त्यांच्या आयुष्याच्या उतरत्या वयातील अनेक संध्याकाळी माझ्याजवळ मोकळेपणाने रीत्या केल्या. खूप मोठा ऐवज आहे माझ्याजवळ... जो जपायला सांगा बाबूराव...
त्या तिकडे न्यू यॉर्कमध्ये माझ्या आकाराची २८ ते ३० मैदानं बसतील एवढं मोठं सेंट्रल पार्क आहे. ते आजवरच्या कोणत्याही सरकारनं सांभाळलेलं नाही. तिथल्या जनतेनं ते सांभाळलं आहे. जपलं आहे. तुम्ही एक मैदान जपू शकत नाही का रे... माझी स्मशानभूमी नका करू... तुमच्या राजकारणासाठी अवघा देश पडलाय... माझ्याच जिवावर नका तुमचे राजकारण करू... तुम्हीच जर माझा इतिहास मोडून तोडून टाकला तर पुढच्या पिढ्यांना तुम्ही काय सांगणार आहात...? लताबाई, देशाच्या, जगाच्या होत्या. त्यांचे स्मारक भव्यदिव्य करा; पण त्यासाठी माझ्या जागेवरून राजकारण करू नका... मला अजून अनेक सचिन घडवायचे आहेत. अनेक तरुणांना शारीरिक बळ द्यायचं आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्यांना आधार द्यायचा आहे. तुमच्या राजकारणापायी त्या सगळ्यांची माती नका रे करू...
आणि शिवाजी पार्कच्या चोहूबाजूंनी बाबूरावांना कोणीतरी हमसून हमसून रडत असल्याचा आवाज येऊ लागला. खिन्न मनानं ते घराकडे परतले... तेव्हा बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरून सूर येत होते...
यूँ हसरतों के दाग,
मुहब्बत में धो लिये,
खुद दिल से दिल की बात कही,
और रो लिये...