काँग्रेस-राकाँची आघाडी बदलू शकते समीकरण
By Admin | Published: January 24, 2017 10:44 PM2017-01-24T22:44:09+5:302017-01-24T22:44:09+5:30
अकोला : अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली तर भाजप आणि शिवसेनेला याचा फटका बसणार आहे.
अकोला : अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली तर भाजप आणि शिवसेनेला याचा फटका बसणार आहे. सोबतच समविचार पक्ष असलेल्या युडीएफ, भारिप-बमसं, आणि एमआयएम सारख्या पक्षांना अपयशाचे घोट पचवावे लागणार आहे.
अकोला महापालिकेची तिसरी निवडणूक यंदा होऊ घातली आहे. विसही प्रभागांची भौगिलीक रचना बदलल्याने मतदारांची वाढ झाली आहे. कमी वेळात हजारो मतदारांपर्यंत पोहोचावे लागत असल्याने नगरसेवकांची चांगलीच दमछाक होत आहे. पक्षाचे उमेदवारच एकामेकांना साथ देऊन हा भार उचलणार आहेत. त्यामुळे एकटयाची ताकद कमी पडणार आहे. भाजपची तगडी स्थिती पाहून राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान काँग्रेसनेही अनुकूल स्थिती दर्शविली. मुंबईत वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली तर अकोल्यातील आघाडी मजबूत होणार आहे. भाजप-सेना युतीला स्वतंत्रपणे ताकद लावावी लागणार आहे. यामध्ये भाजप तरणार असली तरी त्याचा फटका सेनेला जास्त बसण्याची शक्यता आहे. आघाडीचा फायदा अकोला महानगरातील ८ मुस्लिम प्रभागात जास्त दिसून येईल. मात्र जे नगरसेवक काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नुकताच राष्ट्रवादीत आले. त्यांना या आघाडीमुळे सोबत प्रचार करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी तर या उमेदवारांना पक्षाचे तिकिटही मिळते की नाही अशी स्थिती झाली आहे. त्यातून जर वितुष्ट निर्माण झाले तर आघाडीला ही निवडणूक तारक ऐवजी मारक ठरणार आहे. मुंबईच्या बैठकीत आघाडीचा निर्णय काय होतो, याकडे अकोल्यातील दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्यांचे लक्ष लागून आहे.