संपाला संमिश्र प्रतिसाद

By Admin | Published: June 16, 2015 03:43 AM2015-06-16T03:43:43+5:302015-06-16T03:43:43+5:30

मोबाइल अ‍ॅप्सवर चालणाऱ्या खासगी टॅक्सी सेवांवर बंदी घालावी, अशी मागणी करत स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा युनियनतर्फे सोमवारी मुंबईत बंद पुकारण्यात आला होता.

Combine Composite Response | संपाला संमिश्र प्रतिसाद

संपाला संमिश्र प्रतिसाद

googlenewsNext

मुंबई : मोबाइल अ‍ॅप्सवर चालणाऱ्या खासगी टॅक्सी सेवांवर बंदी घालावी, अशी मागणी करत स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा युनियनतर्फे सोमवारी मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला शहर आणि उपनगरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी टॅक्सी चालकांवर जबरदस्ती केली जात होती. त्यासाठी तब्बल १५0 टॅक्सी फोडल्याचा आरोप मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून स्वाभिमानवर करण्यात आला आहे. या बंदमध्ये रिक्षा चालक मात्र सामील झाले नाहीत. या बंदनंतर आता १७ जून रोजी मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून बंद पुकारण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात मोबाइल अ‍ॅपवर धावणाऱ्या खासगी टॅक्सी मोठ्या प्रमाणात असून त्यांची सरकारदरबारी नोंद नसतानाही त्या धावत आहेत. या खासगी सेवा काळ्या-पिवळ्या टॅक्सींप्रमाणे प्रवाशांकडून किलोमीटरच्या दरात भाडे आकारत असून त्यामुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे खासगी टॅक्सी सेवांना विरोध करत त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी सर्वच रिक्षा-टॅक्सी युनियनकडून वेळोवेळी सरकारकडे करण्यात आली आहे. त्यासाठी स्वाभिमान टॅक्सी रिक्षा-युनियनकडून सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. यात १० हजारपेक्षा अधिक टॅक्सी-रिक्षा चालक सामील होतील, असा दावा युनियनचे अध्यक्ष के.के. तिवारी यांनी केला होता. मात्र टॅक्सी वगळता रिक्षा या संपात सहभागी झाल्या नसल्याचे दिसून आले. स्वाभिमानकडून रेल्वे स्थानकांबाहेरील टॅक्सी सेवांवर लक्ष केंद्रित करत त्या ठिकाणी बंद करण्यात आला होता. मुंबई सेंट्रल, सीएसटी, दादर, भायखळा या स्थानकांबाहेर टॅक्सी मिळवताना प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडत होती. प्रिपेड टॅक्सी सेवाही उपलब्ध होत नसल्याने त्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले.
............................................

१७ जूनला रिक्षा बंद
ओला, उबेरसारख्या खासगी टॅक्सी कंपन्या अनधिकृत व्यवसाय करत असून त्याचा काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यासाठी खासगी टॅक्सींवर बंदी आणावी यासह अन्य मागण्यांसाठी १७ जून रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचे मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. हा संप मुंबई, ठाणे, कल्याण-डोेंबिवलीसह, वसई-विरार, नालासोपारा, अर्नाळा या भागांत होणार असल्याने स्थानिकांचे हाल होऊ नयेत यासाठी एसटीकडून १00 बसेसची सोय करण्यात आली आहे.
.......................................

आरोप-प्रत्यारोप
स्वाभिमान टॅक्सी-रिक्क्षा युनियनचे संस्थापक अध्यक्ष व आ. नितेश राणे यांनी सांगितले की, या खासगी टॅक्सी सेवांचे वर्चस्व वाढले असून त्यांच्या मनमानी कारभारामुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांना फटका बसत आहे. त्यासाठीच हा बंद पुकारला होता. राज्य सरकारकडूनही याविषयी मदत मिळत नसून पुढे बंदची धार तीव्र करण्यात येईल. तर क्वाड्रोस यांनी केलेले आरोप पुरावे घेऊन करावेत, असेही राणेंनी सांगितले.

जनतेला वेठीस धरू नका
-रिक्षाचालकांच्या मागण्यांचा शासन सहानुभूतिपूर्वक विचार करीत असताना त्यांनी बेमुदत संपाची भाषा करणे योग्य नाही. त्यांनी जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज केले. पत्रपरिषदेत ते म्हणाले की, तरीही संप झालाच तर त्याला तोंड देण्याची शासनाची पूर्ण तयारी आहे.
-राज्य परिवहन महामंडळाच्या १०० बसेस मुंबईत चालविण्यात येतील. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरूनगर, ठाणे-१, ठाणे-२, कल्याण, विठ्ठलवाडी, वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारांमधून या बसेस सोडण्यात येतील. हात दाखविल्यानंतर बस थांबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास आणखी बसेस देऊ. याशिवाय, बेस्टच्या जादा फेऱ्या असतीलच.
- हकीम समितीला विरोध असल्याचा दावा करणाऱ्या संघटनांनी या समितीसमोर आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी विनंती केलेली आहे. या विसंगतीकडे रावते यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. शिवसेना प्रणीत संघटना या संपात सहभागी होणार नाही, असे संघटनेचे नेते आ. अनिल परब यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Combine Composite Response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.