सत्ता स्थापनेवरून खिल्ली, राग, समर्थन, विरोध, सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 06:05 AM2019-11-24T06:05:33+5:302019-11-24T06:05:48+5:30
शनिवारी सकाळी अचानक झालेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअॅप्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी खिल्ली, राग, समर्थन आणि विरोध अशा संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.
मुंबई : शनिवारी सकाळी अचानक झालेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअॅप्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी खिल्ली, राग, समर्थन आणि विरोध अशा संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. दिवसभर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती.
शनिवारची सकाळ महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी देणारी ठरली. मतदारराजा झोपेमध्ये असताना शनिवारी राजकीय भूकंप झाला. राज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युतीचे सरकार बनवण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीने पार पडल्याची माहिती समोर आली आणि चर्चांना उधाण आले.
‘काकांनी पावसामध्ये कमावले’, ’पुतण्याने रातोरात गमावले’, ’महाराष्ट्राची झोपेतच हत्या’, ‘पाठीत खंजीर खुपसला हे फक्त ऐकत आलो होतो, आता प्रत्यक्षात बघतोय’, ‘आता भाजप आणि राष्ट्रवादीचे भक्त कार्यकर्ते...’, ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’, ‘मी पुन्हा येईन - मी पुन्हा येईन, वाटलं नव्हतं सकाळी सकाळी येईन’, ‘भाजप पहिल्या दिवसापासून म्हणत होते, वेट अॅण्ड वॉच म्हणून, आता समजलं वॉच म्हणजे घड्याळ’, अशा विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिवसभर चर्चेत होत्या.
राजकीय रंग...
काहींनी आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे, अशी मागणीही केली, तर शनिवारी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे तर काही खिल्ली उडवणारे विनोद सोशल मीडियावर व्हायरल झाले. काहींनी सोशल मीडियावरून आपला राग व्यक्त केला. तर काहींनी भाजपच्या निर्णयाचे समर्थनही केले, काहींनी विरोध दर्शवला. त्यामुळे दिवसभर सोशल मीडियावर राजकीय रंग चढल्याचे पाहायला मिळाले.