आले तर सोबत नाहीतर एकट्याने; भाजपची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 05:55 AM2019-11-04T05:55:05+5:302019-11-04T05:56:42+5:30
फडणवीस यांचा चार दिवसांत शपथविधी
मुंबई : सत्तास्थापनेसाठी शिवसेना सोबत आली तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारचा किंवा सोबत न आल्यास केवळ भाजप सरकारचा शपथविधी होणार आहे. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.
शिवसेनेला दिलेल्या प्रस्तावासंदर्भात प्रतिसादाची अखेरपर्यंत वाट पाहू. तोपर्यंत तिढा सुटला नाही तर २०१४ प्रमाणे केवळ भाजप मंत्र्यांचा शपथविधी करावा, असे भाजपमध्ये ठरले असल्याचे समजते. मात्र त्यापूर्वी शिवसेनेने मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सूत्रांनी सांगितले की, ते प्रयत्न सफल झाले किंवा अपयशी ठरले तरी ७ नोव्हेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी करायचा, असे भाजपचे ठरले आहे.
भाजपने महसूल आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती शिवसेनेला देण्याची तयारी दर्शवली आहे. उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदे देऊ केली आहेत. तथापि नगर विकास, वित्त आणि गृह ही खाती मात्र देण्यास सपशेल नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना सत्तेत सहभागी होत असल्याचे दर्शविण्यासाठी शिवसेनेच्या दोनच मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर शपथ घ्यावी आणि इतर मंत्री व खात्यांसंदर्भात चर्चा सुरू ठेवून लगेच काही दिवसांत विस्तारामध्ये शिवसेनेचे आणखी मंत्री सामावून घ्यावेत, असाही एक प्रस्ताव भाजपकडून दिला जाऊ शकतो.
राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल - मुख्यमंत्री
सरकार लवकरच स्थापन होईल. सध्याचे सरकार काळजीवाहू आहे. या सरकारला निर्णय घेताना काही बंधने आहेत. तरीही, नियमांच्या अधीन राहून आम्ही काम करीत आहोत. महाराष्ट्राचे हित लक्षात घेता सत्तास्थापनेचा तिढा सोडवून, लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर दिली.