चला मुलांनो, शाळेत चला!; १५ जुलैपासून कोरोनामुक्त भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 11:42 AM2021-07-08T11:42:00+5:302021-07-08T11:42:35+5:30
शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना एक महिना आधी गावात एकही कोविड रुग्ण नको, असा नवा निकष आहे. प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी हा तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये, असेही अधोरेखित केले आहे.
मुंबई : ‘चला मुलांनो, शाळेत चला’ या मोहिमेनुसार राज्यातील कोविडमुक्त भागात १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतचा सुधारित सरकारी निर्णय शिक्षण विभागाकडून बुधवारी जारी करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील समिती आणि पालकांचा ठराव होऊन मान्यता मिळणे आवश्यक आहे.
शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना एक महिना आधी गावात एकही कोविड रुग्ण नको, असा नवा निकष आहे. प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी हा तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये, असेही अधोरेखित केले आहे.
ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली सात सदस्यीय समिती शाळा सुरू करण्याचा निर्णय घेईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी नियोजन करून पार पाडावी, अशा सूचनाही आहेत. शाळा सुरू झाल्यावर शिक्षक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आजारी पडल्यास त्यांच्या अलगीकरणाचे नियोजन, तसेच शाळा काही दिवसांसाठी बंद करावी लागल्यास शिक्षण सुरू राहण्यासाठीचा आराखडा शाळेने तयार करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरी भागांतील शाळांबाबत संभ्रम
ग्रामीण भागातील शाळांसाठी ठराव कोणी करावा यासंदर्भात सूचना आहेत. मात्र, शहरी भागात ही जबाबदारी कोणाची असेल याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. फक्त ग्रामीण भागातील शाळाच सुरू करायच्या का, असा प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापक विचारत आहेत.
शाळा सुरू करताना महत्त्वाचे निकष
- शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक
- वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी
- शाळेतील स्नेहसंमेलन,
परिपाठावर कडक निर्बंध
- शिक्षक, विद्यार्थी यांची दैनंदिन थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य
अकोल्यातील कापशी गावात साेमवारपासून शाळा
- सरकारी निर्देशांचे पालन करीत अकाेला तालुक्यातील कापशी
ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याचा ठराव घेतला आहे.
- साेमवार, १२ जुलै रोजी शाळा सुरू हाेणारे कापशी हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरणार आहे. येथे सर्वप्रथम इयत्ता आठवी, नववी व दहावीचे वर्ग सुरू होणार आहेत.