चला, सोने लुटायला !

By admin | Published: November 7, 2014 12:24 AM2014-11-07T00:24:56+5:302014-11-07T00:48:04+5:30

दरात घसरण : खरेदीसाठी गर्दी, रोजची सरासरी २० कोटींची उलाढाल

Come on, loot the gold! | चला, सोने लुटायला !

चला, सोने लुटायला !

Next

भारत चव्हाण- कोल्हापूर -आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलथापालथीमुळे सराफ बाजारातील सोने व चांदीचे दर झपाट्याने उतरत असल्याने या बाजारात सध्या सुगीचे दिवस आहेत. या संधीचा लाभ उठवीत सोने, चांदी व दागिने खरेदी करण्यात ग्राहकांनी दाखविलेल्या उत्साहाने सराफ बाजाराने तेजीचे दिवस अनुभवले आहेत. दररोजची सोने खरेदीची उलाढाल दुप्पटीने वाढली असून, ती २० ते २२ कोटींच्या घरात पोहोचली आहे. सोने-चांदी यांचे दर उतरण्याची तीन प्रमुख कारणे सांगण्यात येतात. गेल्या सहा महिन्यांत डॉलरचा भाव ७० रुपयांवरून ६०-६१ रुपयांवर आला आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कमी झाल्या आहेत आणि तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकास्थित ‘फेड’ नावाची संस्था आहे. अमेरिकेत मंदी आल्यानंतर ‘फेड’ या वित्तीय संस्थेने प्रत्येक तीन महिन्यांचा बाजारपेठेचा कानोसा घेऊन अनेकांना अर्थसाहाय्य केले, पॅकेज दिले होत; परंतु अलीकडे असे पॅकेज देणे बंद केले आहे. त्यामुळे अनेकांनी सोने विक्री करण्यास सुरुवात केली.

बाजारपेठेत तेजीच
सोने-चांदीचे दर उतरल्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाल्याचे चित्र आहे. प्रचंड वाढलेले दर पाहून सामान्य ग्राहकांनी गेल्या दोन-तीन वर्षांत सोने-चांदी खरेदीकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट होते; परंतु आता दर उतरत असल्याने ग्राहकांनी खरेदीत उत्साह दाखविला आहे. मंदीच्या काळात सोनेबाजारात दररोज किमान ८ ते १० कोटींची उलाढाल होत असे, ती आता २० ते २२ कोटींच्या घरात पोहोचली आहे. सोन्याच्या खरेदीत दुप्पटीने वाढ झाल्याचे सराफ व्यावसायिक मान्य करतात; पण खरेदीची आकडा मात्र सांगण्यास त्यांचा नकार दिसतो.

आणखी दर उतरण्याची शक्यता
गेल्या दोन महिन्यांत ३१०० रुपयांनी दर उतरल्यानंतरही आणखी दर उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजून किमान २००० ने दर उतरतील, असा अंदाज आहे. त्यामुळे काही खरेदीदार ‘उद्या पाहू’ म्हणत आजची खरेदी उद्यावर ढकलत आहेत.

आठ दिवसांत १६०० ने दर घसरला
दोन महिन्यांपूर्वी सोन्याचा दर २९ हजार रुपये होता, आता तो २५ हजार ९०० पर्यंत खाली आला आहे. म्हणजे ३१०० रुपयांनी भाव खाली घसरला आहे. आठ दिवसांपूर्वी २७ हजार ५०० रुपये असणारा दर २५ हजार ९०० वर आला. केवळ आठ दिवसांतच १६०० रुपयांनी दर उतरला. गेल्या दोन महिन्यांत झपाट्याने दर खाली आल्याने स्वाभाविकच आणखी किती दर उतरणार आहेत, अशी उत्कंठा सराफ बाजारपेठेला लागून राहिली आहे. उतरलेल्या दराचा ग्राहकांनी मात्र पुरेपूर लाभ उठविण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता लग्नाचा हंगाम सुरू होत असल्याने सोने घेऊन ठेवणाऱ्याची संख्या वाढली आहे.

सोने दर उतरत असल्याने ग्राहकांत खरेदीचा उत्साह नक्की आहे. दर आणखी उतरतील अशा अपेक्षा असल्याने बहुसंख्य ग्राहक खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. एक वर्षापूर्वी जो दर होता, तो आता मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे ग्राहकांची अजूनही थांबायची तयार दिसते.  --- प्रसाद कामत

सोने-चांदीचे दर झपाट्याने खाली येत असल्याने खरेदी दुप्पटीने वाढली आहे. यापूर्वी दर वाढल्यामुळे सामान्य ग्राहक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे झुकला होता; परंतु आता सोने घेणे शक्य होत असल्याने पुन्हा गुजरी बाजारपेठेत गर्दी होत आहे.  - राजेश राठोड -उपाध्यक्ष, सराफ व्यापारी संघ

Web Title: Come on, loot the gold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.