चला, पेंग्विन वाचवू या...

By admin | Published: October 29, 2016 11:46 PM2016-10-29T23:46:18+5:302016-10-29T23:46:18+5:30

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील आठपैकी एका मादी पेंग्विनचा मृत्यू झाला; आणि महापालिकेतल्या सत्ताधारी विशेषत: शिवसेनेवर

Come on, save the penguins ... | चला, पेंग्विन वाचवू या...

चला, पेंग्विन वाचवू या...

Next

- सचिन लुंगसे

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील आठपैकी एका मादी पेंग्विनचा मृत्यू झाला; आणि महापालिकेतल्या सत्ताधारी विशेषत: शिवसेनेवर चोहोबाजूंनी टीका होऊ
लागली. शिवसेनेने त्यांच्या परीने टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्नही केला. मात्र ही टीका होत असतानाच उर्वरित सात पेंग्विनची कशी काळजी घेता येईल, त्यांना आवश्यक सेवा-सुविधा पुरवण्याबाबत कोणत्या घटकांना प्राधान्य देता येईल या व अशा अनेक मुद्द्यांवर कोणीच बोलले नाही. विशेषत: विदेशातील प्राणिसंग्रहालयात पेंग्विनच्या खाण्यापिण्यासह बाळगण्यात येणाऱ्या खबरदारीचा कित्ता गिरवण्याऐवजी येथे झाले ते पेंग्विनच्या मृत्यूचे ‘राजकारण’.
पेंग्विन हा काही मुळात इथला पक्षी नाही. पेंग्विन हा एक उडू न शकणारा पक्षी आहे. या पक्ष्याचे वास्तव्य पाण्याजवळ आढळते. हा पक्षी दक्षिण गोलार्धात आढळतो. मात्र मागील काही वर्षांपासून पेंग्विनच्या काही प्रजातींचे अस्तित्व उष्णकटीबंधीय क्षेत्रातही आढळून येत आहे. परिणामी पेंग्विनच्या आकर्षणामुळे विदेशातील प्राणिसंग्रहालयामध्ये त्याचे अस्तित्व जाणवते आहे. पेंग्विनला प्राणिसंग्रहालयात दाखल करताना तेथील वातावरण त्याला पोषक करण्यावर भर
दिला जात आहे. विदेशातील तंत्रज्ञान प्रगत आणि विकसित असल्याने साहजिकच संबंधित ठिकाणावरील वातावरण कृत्रिम असले तरी त्याला ते पूरक ठेवण्यावर भर
दिला जातो, अशी माहिती मुंबईस्थित पक्षीतज्ज्ञांनी दिली.
राणीच्या बागेत पेंग्विन दाखल करताना मुंबई महापालिका प्रशासनानेही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. पेंग्विनला पोषक आणि पूरक वातावरण तयार करण्यासाठी येथे त्यांच्या वास्तव्याकरिता क्वारंटाईन क्षेत्र बांधण्यात आले आहे. सात पेंग्विनला क्वारंटाईन क्षेत्रात ठेवण्यात आले असून, क्वारंटाईन सुविधा आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार तयार करण्यात आली आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. विशेष म्हणजे पेंग्विन पक्ष्यांना सुमारे तीन महिने क्वारंटाईन सुविधेत ठेवण्यात येणार असून, या कक्षातील तापमान १६ ते १८ डिग्री सेल्सिअस एवढे ठेवण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने येथे पेंग्विन दाखल करतेवेळीच विदेशातील तज्ज्ञांसोबत चर्चा करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. राणीच्या बागेत पेंग्विनसाठी खास व्यवस्था करण्यात आली असून, येथे स्वतंत्र स्वयंपाकगृह, तीन शिफ्टमध्ये डॉक्टर, पेंग्विनसाठी अनुकूल तापमान अशी सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा आहे. आणि याबाबत वन आणि पर्यावरण विभागाची परवानगी मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र या सर्व सेवा-सुविधा प्रदान करतानाच पेंग्विनला दिल्या जाणाऱ्या अन्नातून बाधा तर पोहोचणार नाही ना, याचीही काळजी घेतली पाहिजे. महापालिका प्रशासन याबाबत पुरेशी काळजी घेत नसल्याचा आरोप होत असून, जो पक्षी मुळातच इथला नाही तो येथे आणल्यानंतर आणि त्यातल्या एका पेंग्विनच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या राजकारणाने पुन्हा एकदा ‘राणीची बाग’ वादाच्या पटलावर आली आहे.

वातावरणात रुळण्यासाठी तीन महिने
राणीच्या बागेतील नवीन इमारतीत तळमजल्यावर सुमारे १ हजार ७०० चौरस फूट क्षेत्रफळात वातानुकूलित कक्ष तयार करण्यात आला. तत्पूर्वी पेंग्विनना शीत वातावरणातील विशेष संरक्षित क्षेत्रात ठेवले होते. पेंग्विन पक्ष्यांना रुळण्यासाठी साधारण तीन महिने लागणार आहेत.

प्राणी आणि पक्षीमित्र
संघटनांचा विरोध कायम
पेंग्विनच्या राणीच्या बागेतील वास्तव्याला पक्षीतज्ज्ञ आनंद सिवा यांच्यासह ‘पॉज’सारख्या प्राणिमित्र संघटनांचा विरोध कायम आहे. कारण राणीच्या बागेतील अनेक पक्षी आणि प्राण्यांना प्राणास मुकावे लागले आहे. संघटनांनी याचे खापर येथील अस्वच्छतेसह पक्षी आणि प्राण्यांना पुरवण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांवर फोडले आहे.

पेंग्विन ४ ते २५ अंश तापमानात  राहू शकतात
राणीच्या बागेतील पेंग्विन हे ४ ते २५ अंश तापमानात राहू शकतात. २० ते २५ वर्षे आयुष्यमान असलेले पेंग्विन पूर्ण वाढ झाल्यावर सुमारे ७० सेंटीमीटपर्यंत उंच, तसेच ६ किलोपर्यंत वजनाचे असतात. बांगडा आणि मोरशी मासे हा या हम्बोल्ट पेंग्विन पक्ष्यांचा आहार आहे. सिंगापूर आणि थायलंडमधील प्राणिसंग्रहालयात हम्बोल्ट पेंग्विन रुळलेले आहेत. ते २५ अंशांपर्यंतच्या तापमानात राहू शकतात, असे मुंबईस्थित पक्षीतज्ज्ञांनी सांगितले.

पेंग्विन आणला तर बिघडले कुठे?
मुंबईकरांनी यापूर्वी पेंग्विन पाहिला असेल तो डिस्कव्हरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट किंवा तत्सम दूरचित्रवाहिन्यांवरून. परिणामी जर आता म्हणजे पेंग्विन राणीच्या बागेत दाखल झाल्यापासून तीन महिन्यांनी मुंबईकरांना ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यास मिळणार असेल तर त्यात वावगे काहीच नाही, असे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी यापूर्वीच ‘लोकमत’कडे मांडले आहे.

राजकारणास कारण
पेंग्विनच्या मृत्यूने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आणि त्यांनी शिवसेनेनेवर निशाणा साधला. मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सेनेवर जहरी टीका केली. काँग्रेस आणि मनसेने सेनेला स्थायी समितीच्या बैठकीत घेरले तर राष्ट्रवादीने रस्त्यांवर ‘पेंग्विनला मारून दाखवले...’ अशा आशयाचे फलक लावत सेनेची खिल्ली उडवली.

Web Title: Come on, save the penguins ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.