आ देखे जरा... किसमें कितना हैं दम!

By admin | Published: November 18, 2015 11:59 PM2015-11-18T23:59:12+5:302015-11-19T00:41:21+5:30

बेधडक संतोष महाडिक : कॉलेज जीवनातील सवंगड्यांनी जागविल्या आठवणी

Come see me ... how much are you in it! | आ देखे जरा... किसमें कितना हैं दम!

आ देखे जरा... किसमें कितना हैं दम!

Next

राजीव मुळ्ये ल्ल सातारा
‘आ देखे जरा... किस में कितना है दम’... कर्नल संतोष महाडिक यांनी कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून बाहेर पाऊल टाकताना झालेल्या निरोप समारंभात म्हटलेलं हे गाणं त्यांच्या सवंगड्यांना अजून जसंच्या तसं आठवतंय. त्यांच्याकडे बेधडकपणा, ताकद आणि शौर्य तर होतंच; पण ताकदीचा अनाठायी वापर करण्यापेक्षा युक्तीने प्रतिपक्षाला नामोहरम करणं, खिलाडूवृत्तीनं जिंकणं हा त्यांचा गुण आज त्यांच्या सवंगड्यांना प्रकर्षानं आठवतोय.
कॉलेजमध्ये संतोष यांचं बोलणं अत्यंत रुबाबदार आणि चालणं शानदार होतं. ‘सेन्ड आॅफ’च्या दिवशी मुलं विरुद्ध मुली अशी अंताक्षरी सुरू झाली. पहिल्यांदा गाणं म्हणायला कुणीच तयार होईना. त्यावेळी संतोष यांनी खड्या आवाजात ‘आ देखे जरा... किस में कितना है दम’ हे गाणं म्हणून वातावरण मोकळं केलं, अशी आठवण त्यांच्या सहाध्यायी सविता कारंजकर यांनी सांगितली. याच बेधडक वृत्तीनंं ते आल्या प्रसंगाला सामोरं जात राहिले, असं त्यांच्या सवंगड्यांनी सांगितलं.
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधून १९९६ मध्ये संतोष महाडिक यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली. त्यावेळी ते ‘संतोष घोरपडे’ होते. ‘सैनिक स्कूलमधून शिस्तीचे धडे घेऊन बाहेर पडलेल्या संतोषला वावगं वागणं सहन होत नसे; पण तो युक्तीने आणि खिलाडूपणे तोडगा काढून अन्याय निपटून काढायचा,’ हे सांगून वैभव पवार यांनी त्यांच्या आगळ्यावेगळ्या गुणांवर प्रकाश टाकला. तसं पाहायला गेलं तर वैभव पवार आणि संतोष घोरपडे हे एका ग्रुपचे नव्हते. कधी तर त्यांचे ग्रुप प्रतिस्पर्धी म्हणूनही एकमेकांसमोर उभे ठाकले; पण संतोष यांच्या खिलाडूपणाने पवार यांना भुरळ पाडली होती.
‘आमच्या ग्रुपने कॉलेजचं दोन दिवसांचं गॅदरिंग शाहू कला मंदिरात आयोजित केलं होतं,’ वैभव पवार सांगत होते, ‘पहिल्या दिवशी दुसऱ्या कॉलेजच्या मुलांनी येऊन खूप गोंधळ घातला. मुलींना त्रास दिला. संतोषचा सैनिक स्कूलमधून आलेल्या चार-पाच मुलांचा ग्रुप होता. दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यक्रम होता. त्यावेळी बाहेरची मुलं कशी थोपवायची, प्रश्न पडला होता. परंतु संतोष आमच्याकडे आला आणि म्हणाला, ‘उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. कार्यक्रम शांततेत झाला पाहिजे. भांडणं होऊ द्यायची नाहीत.’ प्रतिपक्षातील असूनही तो आमच्या मदतीला आला होता.’
दुसऱ्या दिवशी शाहू कला मंदिराच्या गेटवर चार-पाच मित्रांसह तो स्वत: थांबला. दुसऱ्या कॉलेजमधील मुलांना गेटवर अडवून तो इतकंच म्हणाला, ‘तुम्हाला आत जायचं असेल तर जा; पण ज्याला जायचंय त्यानं मला एक चापट मारायची. जो चापट मारणार नाही, त्याला मी आत सोडणार नाही.’ हे ऐकून बाहेरच्या कॉलेजची मुलं ओशाळली. त्या दिवशी त्यांनी अजिबात दंगा केला नाही.’
या कार्यक्रमात संतोष यांनी योजलेली दुसरी युक्ती सांगताना पवार म्हणाले, ‘त्या दिवशी संतोषने शे-दीडशे नारळ आणि फेटे आणले होते. आम्हाला रांगेत त्याने उभं केलं. गोंधळ करेल, त्याला उचलायचं आणि थेट स्टेजवर न्यायचं. तिथं नारळ देऊन, फेटा बांधून त्याचा सत्कार करायचा. सत्कार का केला, याचं कारण माइकवरून सांगायचं. मग दंगेखोर शांत बसले, कुणीही मुलींवर शेरेबाजी केली नाही आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला.’
उत्कृष्ट संभाषणकौशल्य
संतोष यांचं हिंदी, इंग्रजी संभाषण कौशल्य कॉलेजजीवनात असतानाच अत्यंत प्रभावी होतं, असं त्यांचे मित्र सांगतात. ‘कॉलेजच्या जी. एस. पदासाठी तो निवडणूक रिंगणात होता; परंतु प्रतिस्पर्धी ग्रुपच्या सांगण्यावरून त्याने माघार घेतली होती. पुढच्या वर्षी तोच जी. एस. होणार, हे त्याच वेळी ठरलं होतं. परंतु, पुढील वर्षी जी. एस. पदाचे निकषच बदलले आणि तो अखेरपर्यंत जी. एस. होऊ शकला नाही,’ अशी आठवण मित्र सांगतात. संतोष यांची ही खिलाडूवृत्ती मित्रांनाच नव्हे, तर शत्रूंनाही मोहित करून गेली.

Web Title: Come see me ... how much are you in it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.