सेनेचे बिहारमध्ये ‘एकला चलो’!
By admin | Published: September 21, 2015 01:58 AM2015-09-21T01:58:33+5:302015-09-21T09:24:54+5:30
केंद्रात व महाराष्ट्रातील सत्तेत भाजपासोबत भागीदार असूनही बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या मित्रपक्षांमध्ये स्थान न मिळाल्याने दुखावलेल्या शिवसनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत
पाटणा/ मुंबई : केंद्रात व महाराष्ट्रातील सत्तेत भाजपासोबत भागीदार असूनही बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या मित्रपक्षांमध्ये स्थान न मिळाल्याने दुखावलेल्या शिवसनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत १५० उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी पाटणा येथे ही घोषणा केली.
बिहारमध्ये सेनेची संघटनात्मक बांधणी नाही. त्यामुळे तेथे सेना फारच तुरळक जागा लढवत होती. महाराष्ट्रात जाणाऱ्या बिहारी माणसांच्या विरोधात असलेला अशी पक्षाची तिकडे ओळख आहे. केंद्रात व महाराष्ट्रात सत्तेत भागीदार असूनही त्यांना रालोआत सहभागी करून घेण्याबाबत साधी चर्चाही केली नाही. ही बाब शिवसेनेला खटकली असून, जुने-नवे हिशेब चुकते करण्याकरिता शिवसेना १५० उमेदवार रिंगणात उतरवणार आहे.
मात्र हिंदुत्व, गरिबी व रोजगारनिर्मिती ही त्रिसूत्री घेऊन शिवसेना ही निवडणूक लढवणार असून, २५ जागा लढवणाऱ्या एमआयएमच्या धार्मिक प्रचाराला विरोध करण्याकरिता ‘अखंड भारत’ असे अभियान राबवण्याचे ठरवले आहे.
रालोआचा घटक असलेली शिवसेना बिहारात एकटी का, या प्रश्नाला थेट उत्तर देणे राऊत यांनी टाळले. शिवसेना हिंदी भाषिक प्रदेशांत आपला जनाधार वाढवून येथील लोकांना आपली शक्ती देऊ इच्छिते. म्हणून आम्ही येथे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.
ओवैसी एक ‘विष’
असदुद्दीन ओवैसी यांच्या आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षानेही बिहार निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णयघेतला आहे. याबाबत विचारले असता, ‘अमृता’सोबत ‘विषा’ची कुठलीही चर्चा व्हायला नको. ओवैसी एक ‘विष’ असून, त्यांच्यासारखे लोक राजकारणात आले तर देश पुन्हा एकदा तुटेल, असे वादग्रस्त विधानही राऊत यांनी केले.
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे बिहार निवडणुकीची धुरा स्वत: सांभाळणार असून, तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याकरिता त्यांनी खासदार संजय राऊत व अनिल देसाई यांना धाडले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार करतील तेव्हा
आदित्य बिहारच्या मैदानात उतरलेले असतील!