चला, माथेरानला; आजपासून मिनी ट्रेन सेवा पूर्ववत, अप-डाऊन मार्गावर रोज प्रत्येकी दोन-दोन फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 12:33 PM2024-11-06T12:33:50+5:302024-11-06T12:34:47+5:30
Neral-Matheran Train: नेरळ-माथेरान नॅरोगेज मिनी ट्रेन सेवा बुधवार, ६ नोव्हेंबरपासून पूर्ववत करण्यात आली आहे. पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जूनमध्ये मध्य रेल्वेने ही ट्रेन बंद केली होती. परंतु अमन लॉजपासून माथेरानपर्यंत शटल सेवा सुरू ठेवली होती.
मुंबई - नेरळ-माथेरान नॅरोगेज मिनी ट्रेन सेवा बुधवार, ६ नोव्हेंबरपासून पूर्ववत करण्यात आली आहे. पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जूनमध्ये मध्य रेल्वेने ही ट्रेन बंद केली होती. परंतु अमन लॉजपासून माथेरानपर्यंत शटल सेवा सुरू ठेवली होती. यावर्षी ही ट्रेन सुरू करण्यासाठी थोडा उशीर झाला आहे.
ज्यामध्ये तीन द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी आणि दोन द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन असणार आहे. नेरळ-माथेरानदरम्यान या ट्रेनच्या रोज अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी दोन-दोन सेवा चालविण्यात येणार आहेत. अमन लॉज ते माथेरानदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शटल सेवा चालविण्यात येणार आहे. तिच्या प्रत्येकी ६-६ सेवा असणार आहेत. पर्यटकांची गर्दी लक्षात घेता शनिवार आणि रविवारी २-२ अतिरिक्त सेवा चालविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. मिनी ट्रेन ६ डब्यांसह चालविण्यात येणार आहे.
मिनी ट्रेनचे वेळापत्रक
नेरळ - माथेरान डाऊन • नेरळवरून सकाळी ८.५० वाजता • नेरळवरून सकाळी १०.२५ वाजता
अमन लॉज-माथेरान-अमन लॉज शटल सेवा • माथेरानवरून सकाळी- ०८.२०, ०९.१०, ११.३५, दुपारी - २.००, ३.१५, ५.२०
माथेरान - नेरळ अप • माथेरानवरून दुपारी २.४५ वाजता • माथेरानवरून दुपारी ४ वाजता
अमन लॉज माथेरान शटल सेवा अमन लॉजवरून सकाळी ०८.४५, ०९.३५ • दुपारी १२.००, २.२५, ३.४०, ५.४५
शनिवार रविवारी अतिरिक्त विशेष सेवा • माथेरानवरून सकाळी १०.०५ आणि दुपारी १.१० वाजता • अमन लॉजवरून सकाळी १०.३० आणि दुपारी १.३५
तिकीट दर अमन लॉज- माथेरान • द्वितीय श्रेणी - ५५ • प्रथम श्रेणी - ९५