विनोदी कादंबरी, नाटक लिहायचा विचार घोळतोय
By Admin | Published: April 14, 2015 01:45 AM2015-04-14T01:45:56+5:302015-04-14T01:45:56+5:30
विनोदी नाटक, विनोदी कादंबरी लिहिण्याचा विचार डोक्यात घोळतोय तसाच आत्मचरित्राचाही... सांगत होते ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार!
पुणे : आता संगळे संपले असले तरी मन सांगतेय... तुझ्या डोक्यात जे आहे ते लिहून काढ... विनोदी नाटक, विनोदी कादंबरी लिहिण्याचा विचार डोक्यात घोळतोय तसाच आत्मचरित्राचाही... सांगत होते ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार!
मिरासदार मंगळवारी (दि. १४) ८९व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, ग्रामीण जीवनातील हास्य-विनोद शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या द. मा. यांनी विनोदी नाटक आणि विनोदी कादंबरी लिहिण्याचा मानस ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केला.
वयाच्या या टप्प्यावरही मिरासदार यांचा नित्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू आहे. जसे की, सकाळी थोडा वेळ फिरायला जाणे, वृत्तपत्राचे वाचन करणे, दूरचित्रवाहिनीवरील बातम्या बघणे, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे, शक्य असेल तेवढा प्रवास करणे.
ते म्हणाले, ‘‘डोक्यात आजही अनेक विषय घोळत आहेत. लिखाणासाठी मनही स्फूर्ती देत आहे. असे असले तरी परिस्थिती अनुकूल नाही. विनोदी लेखन केले पण विनोदी नाटक अथवा विनोदी कादंबरी अद्याप लिहिली गेली नाही. या पैकी एखादे जरी जमले तरी स्वत:ला भाग्यशाली समजेन. विनोदी नाटक अथवा कादंबरीसाठी डोक्यात अजून पक्का आराखडा तयार नाही. मुद्दे अर्धवट आहेत. विषयांची भट्टी पूर्ण जमलेली नाही. कादंबरी, नाटक लिखाणासाठी लेखनिक घ्यावा, असे सुचविले जाते; पण काय लिहायचे हे अद्याप डोक्यात नसल्याने काही करता येत नाही. विचरांची मालिका पूर्ण झाली की ते कागदावर उतरण्यास वेळ लागणार नाही.’’
अकलूज येथे वास्तव्य होते तोपर्यंतच्या आठवणी लिहिलेल्या आहेत. नंतर शिक्षणासाठी पंढरपूरला आलो तेथून पुढच्या आठवणी अद्याप लिहिलेल्या नसल्याचे ते म्हणाले.
(प्रतिनिधी)
४१९६१ साली द. मा. मिरासदार यांनी व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील यांच्यासह नागपुरातील धनवटे सभागृहात कथावाचनाला सुरुवात केली. ही आठवण त्यांच्या मनात अजूनही ताजी आहे. हा संदर्भ देऊन ते म्हणातात, कथावाचन असा प्रकार सध्या फारसा दिसत नाही. कथाकथन तर कुणी करताना दिसत नाही. कथावाचन, कथाकथनात एक वेगळीच मौज आहे. पुढच्या लेखकांनी ही परंपरा सुरू ठेवावी.