कम्फर्ट हॉलिडेने घातला अनेकांना गंडा

By admin | Published: August 8, 2014 01:07 AM2014-08-08T01:07:04+5:302014-08-08T01:07:04+5:30

विदेशात हवाई सफर आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या ‘द कम्फर्ट हॉलिडे’ या कंपनीच्या संचालकांनी अनेकांची फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे.

Comfort Holiday laid down for many people | कम्फर्ट हॉलिडेने घातला अनेकांना गंडा

कम्फर्ट हॉलिडेने घातला अनेकांना गंडा

Next

डॉक्टर, प्राध्यापकांची फसवणूक : काहींची तक्रार; अनेकांची चुप्पी !
नरेश डोंगरे - नागपूर
विदेशात हवाई सफर आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या ‘द कम्फर्ट हॉलिडे’ या कंपनीच्या संचालकांनी अनेकांची फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे, फसगत झालेल्यांमध्ये उपराजधानीसह अनेक ठिकाणच्या नामांकित शिक्षण संस्थांमधील उच्चशिक्षितांचा समावेश असून, आपली फसवणूक झाल्याचे दुसऱ्यांना कसे सांगावे, असा प्रश्न पडल्यामुळे ते गप्प बसून असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. अंबाझरीच्या शिवाजी नगरात द कम्फर्ट हॉलिडेचे कार्यालय आहे. विवेक पांडे या कंपनीचे संचालन करतात. देश-विदेशातील हवाई प्रवासाचे तिकीट, तेथील राहाण्याखाण्याची आणि फिरण्याची व्यवस्था करण्याचा दावा पांडे करतात.इटली येथील पीसामध्ये ८ ते १२ सप्टेंबरला ‘युरोकोरर २०१४’ ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी भारतातून केवळ दोन शोधनिबंध निवडण्यात आले असून, त्याचे प्र्रेझेंटेशन करण्यासाठी विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतील प्रा. डॉ. योगेश पुरी, प्रा. डॉ. अवनीकुमार पाटील, प्रा. विश्रुत लांडगे, वायसीसीचे प्रा. सचिन अंबादे आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथील प्रा. डॉ. नीलय खोब्रागडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वांनी इटलीला जाण्यासाठी विवेक पांडेंच्या द कम्फर्ट हॉलिडेच्या कार्यालयात संपर्क केला. पांडेंनी सांगितल्याप्रमाणे १६ मे ते २७ मे २०१४ या कालावधीत एकूण २,०६,५२० रुपये रक्कम दिली.
इटलीत फजिती,
पांडे नॉट रिचेबल
महिनाभरापुर्वी पांडेंनी एका ज्येष्ठ प्राध्यापकाची इटलीत मोठी फजिती केली. ‘कम्फर्ट‘च्या माध्यमातून ‘पॅकेज’ घेणाऱ्या या प्राध्यापकांना इटलीत एका शहरातील हॉटेलमध्ये राहण्या-खाण्याची व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले होते. प्राध्यापक त्या हॉटेलमध्ये पोहचले तेव्हा त्यांना तेथे त्यांचे ‘बुकिंग‘ नसल्याचे कळले. प्राध्यापकाने कसेबसे दिवस काढून आपले गाव गाठले. पांडेंनी नंतर त्यांच्यासोबतही भाईगिरी केली. हाँगकाँगचे तिकीट मिळवण्यासाठी गेलेल्या एका महिला प्राध्यापिकेसोबतही अशीच फसवणूक झाल्याची माहिती आहे. या संदर्भात पांडे यांची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांनी लेटरपॅडवर नमूद केलेल्या मोबाईलवर प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला. मात्र, ते नॉट रिचेबल होते.
ई तिकीट पाठविले
डॉ. पुरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एअर इंडियाकडे काही दिवसानंतर तिकीटच्या कन्फर्मेशनसाठी चौकशी केली. पांडेंनी केवळ काही दिवसांसाठी तिकीट ब्लॉक केले होते, रक्कम जमा न केल्यामुळे ही ‘ब्लॉकिंग कॅन्सल’ झाल्याचे त्यांना एअर इंडियाकडून कळले. डॉ. पुरी आणि इतरांनी याबाबत पांडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी असंबद्ध कारण सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांकडे जाण्याची भाषा वापरताच पांडेंनी डॉ. पुरी यांना धनादेश दिला. मात्र, तो वटलाच नाही.
चेक बाऊन्स झाल्यामुळे डॉ. पुरी आणि सहकाऱ्यांनी परत पांडेंशी संपर्क साधला. यावेळी विवेक पांडे आणि त्यांचे वडील शेषनाथ पांडे यांनी क्षमायाचना करून घेतलेली रक्कम आठवडाभरात रोखीने परत करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर पुन्हा एक आठवड्याची मुदत मागितली. मात्र, पैसे परत करण्याचे तर सोडा पांडे आता भाईगिरीची भाषा वापरत आहे. त्यामुळे फसगत झालेली डॉक्टर, प्राध्यापक मंडळी हादरली आहे. त्या वेळेला (मे २०१४) ४४ हजारात मिळणारे तिकीट या मंडळींनी आता प्रत्येकी ६२ हजार रुपये देऊन विकत घेतले आहे.
अर्थात या सर्वांना प्रत्येकी १८ हजारांचा (एकूण ९० हजार) भुर्दंड बसला, तो वेगळा आहे. आपली रक्कम परत मिळावी यासाठी कार्यालयात चकरा मारताना पांडेंनी अशाच प्रकारे अनेकांची फसगत केल्याचेही पीडित डॉक्टर, प्राध्यापकांच्या लक्षात आले आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद
पांडेंच्या या बनवेगिरीची उपरोक्त मंडळींनी २१ जुलैला अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रारंभी पांडेंनी फसवणूक केल्याचे मान्य करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन देणाऱ्या पोलिसांनी आता मात्र भूमिका बदलवली आहे. ‘चौकशी सुरू असल्याची रेकॉर्ड‘ पोलीस अनेक दिवसांपासून वाजवत आहे. त्यामुळे फसगत झालेली मंडळी पांडेंवर कडक कारवाई व्हावी यासाठी शुक्रवारी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांची भेट घेणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Comfort Holiday laid down for many people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.