'लोकमत'च्या बातमीवर ठाकरे सरकारचं शिक्कामोर्तब; घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 02:26 AM2020-08-27T02:26:55+5:302020-08-27T02:27:42+5:30
मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार असल्याचे वृत्त लोकमत'ने १८ ऑगस्ट रोजी दिले होते.
मुंबई : कोरोनामुळे थंडावलेल्या बांधकाम व्यवसायाला गती देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुद्रांक शुल्कात मोठी सवलत देण्यात आली असून १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी ३ टक्के तर १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सध्या ५ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते.
मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार असल्याचे वृत्त लोकमत'ने १८ ऑगस्ट रोजी दिले होते. कोरोनातील लॉकडाऊनमुळे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी मधून राज्याला मिळणाऱ्या महसुलात गेल्या चार महिन्यात ६८३८.७९ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या निर्णयामुळे घरांच्या खरेदी विक्रीला गती येईल. तसेच घरांच्या किमती देखील कमी होतील आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
वाहनांना करमाफी
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये फटका बसलेल्या वाहतूक क्षेत्राला दिलासा देत सार्वजनिक आणि माल वाहतूक करणाºया वाहनांना वाहन कर माफी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या सहा महिन्यांच्या कालावधीत वाहन कर भरण्यापासून १०० टक्के माफी देण्यात आली आहे. याचा अर्थ २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५० टक्के करमाफी देण्यात आली आहे. मालवाहतूक करणारी वाहने, पर्यटक वाहने, खोदकाम करणारी वाहने, खाजगी सेवा वाहने, व्यावसायिक कॅम्पर्स वाहने, स्कूल बसेस या वार्षिक कर भरणाºया वाहनांना ही करमाफी लागू राहणार आहे.