दिलासा! राज्यात एका दिवसात ३२ हजार रुग्ण झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 07:28 AM2020-09-22T07:28:28+5:302020-09-22T07:29:04+5:30
रुग्णनिदानापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; दैनंदिन बाधितांच्या प्रमाणातही घट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची विक्रमी नोंद झाली असून ३२ हजार ०७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. शिवाय, दैनंदिन रुग्णांच्या प्रमाणातही घट झाली आहे. आज राज्यात १५ हजार ७३८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून दररोज सुमारे २० हजार नव्या रुग्णांची नोंद होत होती. मात्र आज नवी रुग्णसंख्या पाच हजारांनी कमी झाली. आतापर्यंत एकूण ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्के असून आज बरे झालेल्या रुग्णांपेक्षा निम्म्या संख्येने नवीन रुग्णांचे निदान झाले. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही कमी म्हणजे २ लाख ७४ हजार ६२३ इतकी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात सद्य:स्थितीत एकूण १८ लाख ५८ हजार ९२४ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३५,५१७ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज ३४४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्युदर २.७ टक्के एवढा आहे.