दिलासा; ऑक्सफर्डच्या लसीचा स्वयंसेवकांवर दुष्परिणाम नाही, पालिका प्रशासनाने दिली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 08:46 AM2020-10-23T08:46:22+5:302020-10-23T08:46:59+5:30
मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, चाचणीत सहभागी स्वयंसेवकाला प्रत्येकी एक कोटीचा आरोग्य विमा लागू आहे. शिवाय लसीचा दुष्परिणाम आढळल्यास ५० लाखांचे विमा कवच आहे.
स्नेहा मोरे
मुंबई : मुंबईत मागील महिन्यात पालिकेच्या नायर आणि केईएम रुग्णालयांत आॅक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोविड-१९ लसीची मानवी चाचणी सुरू केली. आतापर्यंत या मानवी चाचणीत एकूण १६३ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. दिलासादायक म्हणजे ही लस दिलेल्या १६३ स्वयंसेवकांवर कोणतेही दुष्परिणाम झाले नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, चाचणीत सहभागी स्वयंसेवकाला प्रत्येकी एक कोटीचा आरोग्य विमा लागू आहे. शिवाय लसीचा दुष्परिणाम आढळल्यास ५० लाखांचे विमा कवच आहे. मात्र कोणावरही दुष्परिणाम दिसून आलेला नाही.
पांढऱ्या पेशी निर्माण होण्यास मदत
पालिका रुग्णालयांमध्ये लसीच्या चाचणीसाठी सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचे वय २० ते ४५ या वयोगटातील आहे. आॅक्सफर्डच्या लसीमुळे स्वयंसेवकांची रोगप्रतिकारशक्ती बळकट होण्यास, तसेच या लसीच्या माध्यमातून टी-सेल म्हणजेच पांढऱ्या पेशी निर्माण होण्यास मदत होईल, जेणेकरून या पेशी कोरोनाच्या विषाणूविरोधात लढा देऊ शकतील. लसीचा डोस दिल्यानंतर १४ दिवसांत शरीरात प्रतिपिंड (अँटिबॉडी) निर्माण होणार असून त्यांची मुदत २८ दिवसांसाठी असेल. ब्रिटनमध्ये या चाचणीचा पहिला टप्पा पार पडला. केईएम व नायर रुग्णालयात होणाऱ्या मानवी प्रयोग चाचणीत प्रतिकारशक्ती क्षमता आणि लसीची सुरक्षा पडताळण्यात येईल.