Coronavirus: दिलासादायक! राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, तीन दिवसांत नवे रुग्ण अर्ध्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 02:33 AM2020-12-01T02:33:03+5:302020-12-01T07:58:00+5:30
नव्या कोरोनाबाधितांपेक्षा सोमवारी बरे झाले अधिक रुग्ण, राज्यात मंगळवारी ३ हजार ८३७ इतक्या रुग्णांचे निदान झाले असून ८० मृत्यू झाले आहेत. मागच्या काही महिन्यांत दिवसभरात १०- १२ हजार रुग्ण आढळत होते
मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईल या भीतीने आरोग्य विभागासह पालिका प्रशासनाने सर्व स्तरावर तयारी केली आहे. वैद्यकीय तज्ञांनीही रुग्णसंख्या वाढेल अशी शक्यता वर्तविली होती ; मात्र दुसरीकडे राज्यातील दैनंदिन रुग्ण निदान कमी झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.
राज्यात मंगळवारी ३ हजार ८३७ इतक्या रुग्णांचे निदान झाले असून ८० मृत्यू झाले आहेत. मागच्या काही महिन्यांत दिवसभरात १०- १२ हजार रुग्ण आढळत होते. सकारात्मक बाब म्हणजे राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख नियंत्रणात असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी, २९ नोव्हेंबर रोजी ५ हजार ५४४ , २८ नोव्हेंबरला ५ हजार ९६५ आणि २७ नोव्हेंबरला ६ हजार ४०६ इतके रुग्ण आढळले होते.
राज्यात बाधितांची एकूण संख्या १८ लाख २३ हजार ८९६ झाली असून मृतांची संख्या ४७ हजार १५१ वर पोहोचली आहे. राज्यात ९० हजार ५५७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत . सोमवारी ४ हजार १९६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३५ हजार ५३० व्यक्ती घरगुती अलगीकऱणात असून ६ हजार ३५४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकऱणात आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ५६ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.०८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
दिवसभरात ८० मृत्यू
मुंबई १९ , नवी मुंबई ४, कल्याण डोंबिवली २, भिवंडी निजामपूर १, नाशिक ४, नाशिक मनपा ३, मालेगाव १, जळगाव ३, जळगाव मनपा ३, पुणे २, पुणे मनपा १, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ५, सातारा १, रत्नागिरी २, जालना १, हिंगोली २, उस्मानाबाद १, बीड ३, बुलढाणा १, नागपूर ३, नागपूर मनपा ४, चंद्रपूर ७, चंद्रपूर मनपा ४ , गडचिरोली १ आणि अन्य राज्य व देशातील एक रुग्णांचा समावेश आहे.
माॅडर्नाचा दावा : लस १०० टक्के यशस्वी
वाॅशिंग्टन : काेराेनाच्या गंभीर रुग्णांवर लस १०० टक्के प्रभावी ठरल्याचा दावा ‘माॅडर्ना’ या कंपनीने केला आहे. अमेरिका आणि युराेपमध्ये लसीच्या तातडीच्या वापरासाठी कंपनी अर्ज करणार आहे. ‘माॅडर्ना’ने विकसित केलेल्या लसीच्या चाचणीचे सविस्तर निष्कर्ष सादर केले. ही लस ९४.१ टक्के प्रभावी असून काेराेना रुग्णांची प्रकृती गंभीर हाेण्यापासून १०० टक्के बचाव करण्यात लस सक्षम असल्याचा निष्कर्ष कंपनीने काढला आहे. चाचणीदरम्यान १९६ काेराेनाग्रस्त रुग्णांनाही लस देण्यात आली हाेती. त्यात ३० रुग्ण गंभीर हाेते. त्यांच्यावर ही लस १०० टक्के प्रभावी ठरल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘फायझर’ या कंपनीने लसीच्या तातडीच्या वापरासाठी अमेरिकेत अर्ज केला आहे.