दिलासादायक : जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 05:13 AM2020-04-06T05:13:21+5:302020-04-06T05:14:19+5:30
इटली, इराण, अमेरिकेच्या तुलनेत भारताला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बºयाच अंशी यश आले. याचे श्रेय आरोग्य संघटनेने भारताने वेळीच धाडसी निर्णय घेत केलेल्या लॉकडाऊनला दिले.
मुंबई : गेल्या काही दिवसांत भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आता कोरोना भारतात प्रचंड थैमान तर घालणार नाही ना, अशी भीती भारतीयांना आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे चीननंतर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणाºया मृत्यूंची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. याचे श्रेय जागतिक आरोग्य संघटनेने भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना दिले आहे.
कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३,२७० आहे. आता कोरोनावर नियंत्रण मिळविल्याचा दावा चीनने केला असला, तरी नुकतेच तिथे एकाच दिवशी ३६ नवे बाधित आढळले आहेत. कोरोनामुळे इराण, इटली, अमेरिका, स्पेनसह इतर युरोपियन देशांत भीषण परिस्थिती आहे. इटलीचा विचार केल्यास येथे ९ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. ८ मार्चपर्यंत येथे कोरोनाचे ७,३७५ रुग्ण होते, तर ३६६ जणांचा मृत्यू झाला होता. लॉकडाऊननंतर १७ मार्च रोजी येथे ३१,५०६ रुग्ण आढळले, तर २,५०३ जणांना जीवास मुकावे लागले. म्हणजे अवघ्या ९ दिवसांत २४,१३१ रुग्ण वाढले. मृतांची संख्याही तब्बल २,१३७ने वाढली.
इटली, इराण, अमेरिकेच्या तुलनेत भारताला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बºयाच अंशी यश आले. याचे श्रेय आरोग्य संघटनेने भारताने वेळीच धाडसी निर्णय घेत केलेल्या लॉकडाऊनला दिले. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस एडरेनोम गैबरेयेसेस यांनी यासाठी भारताची प्रशंसा केली. तर संसर्गजन्य आजारांवर मात करण्याची भारताची चांगली क्षमता असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक जे. रेयान यांनी व्यक्त केले. मात्र कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही धोक्याची घंटा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याकडे लक्ष वेधले आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताने वेळेत उपाययोजना राबविल्या. लॉकडाऊनमुळे कम्युनिटी ट्रान्समिशन जास्त प्रमाणात दिसत नाही. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि सरकारी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले. यासाठी एक दिवस टाळ्या वाजवून काही होणार नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणूनच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येण्यासाठी भारतीयांनीही परिस्थितीचे (शारीरिक, सामाजिक, आर्थिक) गांभीर्य लक्षात घेऊन योग्य खबरदारी घ्यायला हवी.
अहवाल काय सांगतो?
अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या डिपार्टमेंट आॅफ बायो मेडिकल सायन्सेसने केलेल्या संशोधनानुसार बीसीजी लसीकरण करणाºया देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव कमी दिसून येतो. बीसीजी म्हणजेच बेसिलस कार्मेट ग्युमिन्ग. मात्र, क्षयरोग हा तितकासा जीवघेणा राहिला नसल्याने अनेक प्रगत देशांमध्ये बीसीजीचे लसीकरण केले जात नाही. ज्या देशांनी बीसीजीचे लसीकरण अनेक वर्षांपूर्वी सोडले आहे तेच देश कोरोनाला जास्त बळी पडत आहेत, असे या अहवालात नमूद आहे. या अहवालातील निष्कर्षानुसार, लसीकरण मोहिमेत बीसीजी लस बंधनकारक असलेल्या भारतात यामुळेच कोरोनाचा प्रभाव कमी दिसून येत आहे.