कॉमिक पुस्तिकेतून ‘आघाडी’च्या कर्जमाफीवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 04:48 AM2018-04-06T04:48:40+5:302018-04-06T04:48:40+5:30
‘कथा दोन कर्जमाफींची- धनाजी आणि गुणाजीची’ असे शीर्षक असलेली कॉमिक पुस्तिका प्रदेश भारतीय जनता पार्टीने काढली असून या पुस्तिकेच्या माध्यमातून आघाडी सरकारच्या काळातील कर्जमाफीवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
मुंबई - ‘कथा दोन कर्जमाफींची- धनाजी आणि गुणाजीची’ असे शीर्षक असलेली कॉमिक पुस्तिका प्रदेश भारतीय जनता पार्टीने काढली असून या पुस्तिकेच्या माध्यमातून आघाडी सरकारच्या काळातील कर्जमाफीवर हल्लाबोल करण्यात आला आहे. उद्या भाजपाच्या महामेळाव्याहून परतणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांना या पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार आहे.
या कॉमिक कथेत आघाडी सरकारच्या कर्जमाफीचे आधी कौतुक करणारे धनाजी हे पात्र असून सध्याच्या सरकारची कर्जमाफी आणि लोकाभिमुख योजनांचे सोदाहरण समर्थन करणारे गुणाजी हे पात्र आहे. गुणाजी हा धनाजीचे असे काही ‘ब्रेन वॉश’ करतो की तालुक्याच्या ठिकाणी हल्लाबोल यात्रेत सहभागी होण्यासाठी निघालेला धनाजी कथेच्या शेवटी त्याच्यासारख्यांची माथी भडकविणाºयांवर हल्लाबोल करण्याचा इरादा व्यक्त करतो.
आताच्या सरकारने पाच एकराचे बंधन काढल्याने विदर्भ, मराठवाड्यातील शेतकºयांना कर्जमाफीचा झालेला फायदा, आधीच्या कर्जमाफीत धनदांडग्यांना ४०-४० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कसे माफ झाले, तेव्हाच्या सत्तारूढ आमदाराच्या घरातील आठ जणांना कशी कर्जमाफी मिळाली होती, आताच्या सरकारने आमदार, खासदार, सरकारी अधिकारी, कर्मचारी अशा पगारदारांऐवजी गरजू शेतकºयांनाच कशी कर्जमाफी दिली हे विविध मुद्दे गुणाजी हा धनाजीला पटवून देतो.
आघाडी सरकारमध्ये कर्जमाफीत झालेल्या घोटाळ्यांची माहिती गुणाजी देतो तेव्हा, ‘मग शेतकºयांच्या हक्काचे पैसे गेले कुठे’, असा सवाल धनाजी करतो. त्यावर, हा विचार आता तूच कर, कारण ती तुझ्या लाडक्या सरकारची कर्जमाफी होती ना’, असा चिमटा गुणाजी त्याला काढतो. बाजारातून चप्पल, नवीन फ्रॉक घ्यायचा की बांगड्या याबाबत गोंधळलेली गुणाजीची मुलगी पाहून धनाजी त्याला टोमणा मारतो, की ‘तुझी मुलगी देवेंद्र सरकारसारखीच गोंधळलेली आहे.
कर्जमाफीबाबत या सरकारने अनेक शासन निर्णय बदलले. त्यावर, तुला बदललेले शासन निर्णय दिसले पण प्रत्येक निर्णयासोबत कर्जमाफीचे लाभार्थी वाढत गेले आणि अधिक फायदा करून देणारे ठरले, असे समर्थन गुणाजी करतो. याशिवाय, पंतप्रधान घरकुल योजना, मागेल त्याला शेततळे ही योजना, जलयुक्त शिवार आदी योजनांबाबतही गुणाजी हा धनाजीच्या मनात असलेले गैरसमज दूर करतो.
हल्लाबोल तर करणार
पण माथी भडकवली त्यांच्यावर
या कॉमिक कथेतील आधी आघाडी सरकारचा समर्थक असलेल्या धनाजीचे मन गुणाजी मुद्देसूदपणे वळवितो तेव्हा आधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेला धनाजी शेवटी म्हणतो, ‘मी हल्लाबोल तर करणारच पण स्वत:च्या अज्ञानाच्या राक्षसावर अन् ज्यांनी आमची माथी भडकवली त्यांच्यावर!’