आदेशही वाचला नाही
By admin | Published: October 16, 2015 03:57 AM2015-10-16T03:57:17+5:302015-10-16T03:57:17+5:30
माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त गुरुवारी शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी किमान अर्धा तास वाचनासाठी द्यावा, असा आदेश शासनाने काढला होता
पुणे : माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त गुरुवारी शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी किमान अर्धा तास वाचनासाठी द्यावा, असा आदेश शासनाने काढला होता. मात्र, शासकीय पातळीवर नियोजनाचाच अभाव असल्याने, या दिनाचे परिपत्रकदेखील कर्मचाऱ्यांनी वाचलेले नाही, असे दिसून आले.
डॉ. कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचे धोरण ठरले होते. त्यानुसार, शाळा, महाविद्यालयांतील मुलांना आज अवांतर वाचन करण्यास प्रवृत्त करावे, असा आदेश शालेय शिक्षण व उच्चशिक्षण विभागाने काढला होता. या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी किमान अर्धा तास वाचन करावे, तसेच पुस्तके भेट देण्याबाबत विविध कार्यक्रम आयोजित करावेत, असा एक आदेशही मराठी भाषा विभागाने काढला होता.
मात्र, मराठी भाषा विभागाने हा आदेश या उपक्रमाच्या केवळ एक दिवस अगोदर, म्हणजे बुधवारी संकेतस्थळावर टाकला. त्यामुळे बहुतांश शासकीय कार्यालयांनी हा आदेश वाचलेलादेखील नाही, असे आज ‘लोकमत’च्या पाहणीत निदर्शनास आले.