'लाडकी बहीण'च्या लाभ हस्तांतरणास प्रारंभ; राज्यभरातील बहिणींचे रक्षाबंधन जल्लोषात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 09:29 AM2024-08-15T09:29:35+5:302024-08-15T09:31:00+5:30
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून जाहीर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रक्षाबंधनाच्या ४ दिवस आधीच महाराष्ट्रातील बहिणींच्या खात्यात ओवाळणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या थेट लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून जुलै व ऑगस्ट महिन्याचा एकत्रित लाभ ३००० रुपये राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा
झाला आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून जाहीर केली. “रक्षाबंधनाचा उत्सव सुरू” असं म्हणत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १ कोटी ६४ लाख ४० हजार पेक्षा जास्त महिलांनी नाव नोंदणी केली असून, यापुढेही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू राहणार आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. तसेच, सर्व माता भगिनींनी आपले बँक खाते आधार कार्डला लिंक करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. १६ ऑगस्टपर्यंत एक कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रातील बहिणींना दिलेला शब्द सरकारने पाळला आहे. योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे. निवडणुकीनंतरही आम्ही ही योजना सुरूच ठेऊ.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री