महिलाविरोधी वक्तव्य केल्याची श्रीहरी अणेंवर टीका
By admin | Published: May 7, 2016 08:49 PM2016-05-07T20:49:42+5:302016-05-07T20:49:42+5:30
शासनाने आंदोलनाला हिंसक वळण दिले तर आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाही, हे अॅड. अणे यांचे वक्तव्य महिलाविरोधी असल्याची टीका स्त्री अत्याचार विरोधी परिषदेने केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
अणे यांना महिलांचा अपमान करण्याचा हक्क नाही
नागपूर, दि. 08 - वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांच्यावर एका वक्तव्यामुळे टीका करण्यात येत आहे. शासनाने आंदोलनाला हिंसक वळण दिले तर आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाही, हे अॅड. अणे यांचे वक्तव्य महिलाविरोधी आहे. यातून त्यांनी महिलांचा अपमानच केला असून, असे करण्याचा त्यांना हक्क नसल्याचे टीकास्त्र स्त्री अत्याचार विरोधी परिषदेने सोडले आहे.
६ मे रोजी नवी दिल्लीत अॅड. अणे यांनी ‘नॅशनल फेडरेशन फॉर न्यू स्टेटस्’च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी संबंधित वक्तव्य केले होते. बांगड्या हे महिलांच्या कमकुवतपणाचे लक्षण समजूनच अणे असे म्हणाले आहेत. परंतु हा आमचा अपमान असून आम्ही त्यांचा निषेध करतो, असे मत स्त्री अत्याचार विरोधी परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सीमा साखरे यांनी व्यक्त केले. एके काळी अॅड. अणे यांनी भाषणातून महिलांचा अपमान करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात जनहित याचिका लढविली होती. परंतु राजकीय परिघात प्रवेश झाल्याबरोबर त्यांची मानसिकता बदलली आहे. कोणत्याही पुरुषाने महिलेला कमकुवत समजून तिच्या बांगड्यांवर टीका करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. अणे यांनी विदर्भाच्या आंदोलनाची शक्ती दाखविण्यासाठी महिलांच्या बांगड्यांचा उपयोग केला याची खंत वाटते, असेदेखील डॉ. साखरे म्हणाल्या.