माझ्या धोरणांवरील टीका अर्थशास्त्रीय आधाराविना
By admin | Published: July 18, 2016 04:43 AM2016-07-18T04:43:23+5:302016-07-18T04:43:23+5:30
माझ्या कारकिर्दीत पतधोरण ठरविताना विकासापेक्षा चलनवाढ रोखण्यावर नको तेवढा भर दिला या टिकेला काही अर्थशास्त्रीय आधार नाही.
मुंबई : माझ्या कारकिर्दीत पतधोरण ठरविताना विकासापेक्षा चलनवाढ रोखण्यावर नको तेवढा भर दिला या टिकेला काही अर्थशास्त्रीय आधार नाही. मी या टिकेकडे केवळ चर्चा-संवाद म्हणूनच पाहतो व त्याकडे फारसे लक्ष देत नाही, असे सांगत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी निंदकांना सडेतोड उत्तर दिले.
डॉ. राजन म्हणाले की, चलनवाढ आणि महागाई आता आटोक्यात आली असल्याने रिझर्व्ह बँकेने व्याजाचे दर आणखी कमी करावेत असे म्हणणाऱ्यांनी सध्याच्या महागाईच्या दराला कमी कसे म्हणता येईल, ते आधी स्पष्ट करावे.
व्याजाचे दर चढे ठेवल्याने विकासाचा वेग खुंटला, असा दोष देणाऱ्यांचा संदर्भ देऊन डॉ. राजन यांनी जून या लागोपाठ चवथ्या महिन्यात ग्राहक मूल्य निर्देशांकावर (सीपीआय) आधारित चलनवाढीचा दर वाढून ५.७७ टक्क्यांवर पोहोचला याकडे लक्ष वेधले. विकासाला चालना देण्यात आम्ही कमी पडलो अशी चर्चा सातत्याने सुरु असते. त्याला कोणताही अर्थशास्त्रीय आधार नाही. (विशेष प्रतिनिधी)
>चलवाढ कुठे कमी झाली ते सांगा...
टीकेकडे मी फारसे लक्ष देत नाही, असे ठामपणे सांगत ते म्हणाले की, माझ्यावर टिका करणाऱ्यांनी आधी, सध्याची चलनवाढ व्याजदर कमी करावेत एवढी कमी झाल्याचे कसे म्हणता येईल, ते स्पष्ट करावे.
>पुस्तक लेखन नाही
गव्हर्नरपदावरून पायउतार झाल्यानंतर त्या अनुभवांवर आधारित पुस्तक लिहिण्याचा आपला इरादा नाही. पुस्तक लिहिलेच तर ‘तात्विक प्रश्नांवर’ लिहीन, असेही डॉ. राजन म्हणाले.