व्यावसायिक वाहतूकदार आजपासून जाणार संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 06:00 AM2018-07-20T06:00:22+5:302018-07-20T06:01:04+5:30
खासगी बस, ट्रक, टँकर व टेम्पो यांचा समावेश; १३ लाखांहून अधिक वाहने राहणार बंद
मुंबई : वाहतूकदारांच्या उद्या, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या बेमुदत देशव्यापी संपात राज्यातील १३ लाखांहून अधिक व्यावसायिक वाहने सहभागी होत असून, त्यात ट्रक, खासगी बसेस, टँकर व टेम्पो यांचा समावेश असेल. संपात राज्यातील १0 लाख ट्रकमालक सहभागी होणार आहेत. दीड लाख टेम्पोमालकही संपात सहभागी होत आहेत.
टँकरमालकांनीही संपाला पाठिंबा दिल्याने दूध, पेट्रोल-डिझेल पुरवठ्यावर परिणाम होईल. राज्यातील १ लाखपैकी ३० टक्के टँकर्स तेल कंपन्यांकडे आहेत. ते संपात नसले तरी उर्वरित टँकर्सद्वारे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होणार नाही. शहरांतर्गत वाहतूक करणारे पाच चाकी,
तीन चाकी छोटे टेम्पो वैयक्तिक
उपयोगाचे असल्याने ते संघटनेत व संपात सहभागी नाहीत.
संपकाळात वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहतील. संपात नसलेल्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल. संपकाळात एसटी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बसेसचा वापर केला जाईल.
नागपुरातील संघटनेशी संलग्न पाच जिल्ह्यांमधील वाहतूकदारांच्या संघटनांनी संपातून माघार घेतली. त्यामुळे संपाचा नागपूरसह पूर्व विदर्भावर परिणाम नाही.
स्कूल बसही सहभागी
स्कूल बस मालकांच्या संघटनेने गुरुवारी सायंकाळी या संपाला पाठिंबा जाहीर केला. त्यानुसार शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांना घ्यायला स्कूल बस येणार नाहीत, याची पालकांनी नोंद घेणे आवश्यक आहे.