शिक्षणाचे व्यापारीकरण, भगवीकरण करण्याचे केंद्राचे षडयंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 09:10 PM2017-01-16T21:10:10+5:302017-01-16T21:19:08+5:30
केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने शिक्षण धोरणासंबधी दोन अहवाल प्रसिद्ध केले. परंतू या अहवालातून शिक्षणाच्या व्यापारीकरणाचे व भगवीकरणाचे उदात्तीकरण करण्यात आले.
>ऑनलाइन लोकमत
अकोला,दि.16 - केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने शिक्षण धोरणासंबधी दोन अहवाल प्रसिद्ध केले. परंतू या अहवालातून शिक्षणाच्या व्यापारीकरणाचे व भगवीकरणाचे उदात्तीकरण करण्यात आले. त्यात गुरूकुल पद्धत, वैदीक शिक्षणाचा उल्लेख आहे. मात्र, शाहू, फुले, आंबेडकरांसह स्वातंत्र्य चळवळीतील थोरपुरूषांचे योगदान वगळण्यात आले. स्वतंत्र विचारशक्ती असलेले विद्यार्थी शिक्षणातून घडविण्याऐवजी जागतिक भांडवलशाहीसाठी कुशल मजूर व व्यवस्थेचे भाट निर्माण करणे हे केंद्र शासनाच्या नव्या शिक्षण धोरणाचे व्हिजन आहे. असा आरोप माजी शिक्षक आमदार व अ.भा. समाजवादी अध्यापक सभेचे अध्यक्ष जे.यु. नाना ठाकरे यांनी केला.
समाजवादी अध्यापक सभेच्या वतीने १५ जानेवारीपासून शिक्षणहक्क जनजागरण यात्रेस प्रारंभ झाला. ही यात्रा सोमवारी दुपारी अकोल्यात पोहोचली. महात्मा फुले नर्सिंग महाविद्यालयात यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. देशातील शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडून आला पाहिजे. त्यासाठी समाजात जागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजवादी अध्यापक सभेने विदर्भात यात्रा काढली आहे. शासनाचे धोरण हे विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून, चार्तुवर्ण्य व्यवस्था निर्माण झाली आहे. शाहु, फुले, आंबेडकरांनी गोरगरीबांना शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. परंतू शासनाची त्या उलट भुमिका आहे. त्याचा आम्ही विरोध केला पाहिजे. सर्वांना मोफत आणि गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. अशी भुमिका माजी आमदार ठाकरे यांनी मांडली.