विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांसह आयोगही तयारीला; १३ सप्टेंबरला घेणार तयारीचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 07:01 AM2024-09-11T07:01:11+5:302024-09-11T07:01:39+5:30
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम हे वेगवेगळ्या विभागांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई भेटीनंतर महायुतीतील हालचालींना आलेला वेग, महाविकास आघाडीने आधीच जागावाटपाची सुरू केलेली चर्चा यामुळे निवडणुकीचा माहोल तयार होत असतानाच आता नोव्हेंबरमधील विधानसभेच्या निवडणुकीची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगानेदेखील जोरदार तयारी सुरू केली आहे. आयोगाच्या राज्य मुख्यालयाने तयारीला वेग दिला आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून १३ सप्टेंबरला निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम हे वेगवेगळ्या विभागांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण आणि मुंबई शहर व उपनगरचा दिवसभर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वेगवेगळा आढावा ते घेतील.
मतदान कर्मचाऱ्यांची निश्चिती, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा, निवडणुकीसाठी किती पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज आहे, मतदान केंद्रांची तपासणी, मतमोजणी केंद्रांचे प्रस्ताव, मतदार याद्या अद्ययावत असणे, नियंत्रण कक्ष, माध्यम कक्षाची उभारणी, नोडल अधिकारी नियुक्ती, कर्मचारी प्रशिक्षण, तक्रार निवारण ॲपची स्थिती या बाबतचा आढावा घेतला जाईल.
ईव्हीएमची तपासणी
१ लाखाहून अधिक मतदान केंद्रे असतील. ज्या ईव्हीएम वापरल्या जाणार आहेत त्यांची तांत्रिक तपासणी व त्या मतदानासाठी योग्य असल्याची खात्री भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या तज्ज्ञ अभियंत्यांकडून केली जाईल.