आयोगाचा दणका, पोलिस दलात बदल्या; राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बुधवारी निघाले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 06:49 AM2024-02-29T06:49:50+5:302024-02-29T06:50:03+5:30
निवडणुकीशी संबंधित जबाबदारी असलेल्या पदावर तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करा, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार अखेर राज्य पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलिस महासंचालक कार्यालयाला कराव्या लागल्या. याबाबतचे आदेश बुधवारी काढले.
निवडणुकीशी संबंधित जबाबदारी असलेल्या पदावर तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करा, असे स्पष्ट आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला दिले होते. असे असतानाही अनेकांच्या बदल्या जिल्ह्यातच केल्या. हे प्रकरण महाराष्ट्र प्रशासकीय लवादात (मॅट) गेले होते. शेवटी आयोगाच्या आदेशाविरुद्ध झालेल्या बदल्यांची पडताळणी आयोगाने केली. त्यानंतर २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला. यात छत्रपती संभाजीनगर शहर, ठाणे शहर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आदी ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.
‘लोकमत’चे वृत्त ठरले खरे
निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे पोलिस दलाला काही अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार असे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. ते अखेर खरे ठरले.