मंत्र्यांच्या चौकशीसाठी आयोग नेमा
By Admin | Published: July 31, 2015 02:40 AM2015-07-31T02:40:16+5:302015-07-31T02:40:16+5:30
चिक्की खरेदीसह विविध घोटाळ्यांमध्ये राज्यातील काही मंत्री अडकले असून त्यांच्या निष्पक्ष चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्र्तींचा एक चौकशी आयोग नेमण्याची
मुंबई : चिक्की खरेदीसह विविध घोटाळ्यांमध्ये राज्यातील काही मंत्री अडकले असून त्यांच्या निष्पक्ष चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्र्तींचा एक चौकशी आयोग नेमण्याची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने आज विधानसभेत केली.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था, घोटाळ्यांचे आरोप या बाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, कमिशन आॅफ एन्क्वायरी अंतर्गत ही चौकशी झाली पाहिजे. घोटाळ्यात अडकलेल्या मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजेत.
राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी चिक्की खरेदी, शालेय शिक्षण विभागातील खरेदीवरून पंकजा मुंडे, विनोद तावडे या मंत्र्यांवर टीकेची झोड उठविली. खात्याच्या प्रधान सचिवांनी आक्षेप घेतलेले असतानाही खरेदीचा सपाटा लावण्यात आला. उत्पादनच न करणाऱ्या कंपन्यांना चिक्की, बिस्किटांच्या पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले. सचिवांपेक्षा मी काय म्हणते ते करा, असे निर्णय पंकजा मुंडे यांनी घ्यायला लावले असा आरोप पाटील यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
साठे महामंडळ पुन्हा ऐरणीवर
विरोधी पक्षाकडून सरकारवर हल्लाबोल सुरू असताना भाजपाचे अतुल भातखळकर, आशिष शेलार यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांबद्दलही बोला, असा चिमटा काढला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यावर नंतर म्हणाले की, या महामंडळातील घोटाळ्यात आमचेही आमदार असतील तर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.