आयोग कुणालाही घाबरत नाही
By admin | Published: May 9, 2014 01:53 AM2014-05-09T01:53:49+5:302014-05-09T01:53:49+5:30
वाराणशीतील मोदींच्या सभेला परवानगी नाकारण्यावरून भाजपाकडून होत असलेल्या चौफेर हल्ल्याची अजिबात पर्वा न करता निवडणूक आयोगाने गुरुवारी आपल्यावरील पक्षपातीपणाचा आरोप फेटाळून लावला.
नवी दिल्ली : वाराणशीतील मोदींच्या सभेला परवानगी नाकारण्यावरून भाजपाकडून होत असलेल्या चौफेर हल्ल्याची अजिबात पर्वा न करता निवडणूक आयोगाने गुरुवारी आपल्यावरील पक्षपातीपणाचा आरोप फेटाळून लावला. कोणतीही व्यक्ती, राजकीय पक्ष अथवा संस्थेला न घाबरता आम्ही आमचे काम चोखपणे बजावत असतो, असे ठणकावून सांगत आयोगाने मोदींच्या सभेला परवानगी न देण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. वाराणशीतील घडामोडींवरून बुधवार संध्याकाळपासून झालेल्या गहजबानंतर मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत यांनी घाईघाईत बोलावलेल्या पत्रपरिषदेत आयोगाची भूमिका स्पष्ट केली. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या रॅलीला परवानगी नाकारण्याच्या वाराणशीचे निवडणूक अधिकारी प्रांजल यादव यांच्या निर्णयाचे समर्थन करताना संपत म्हणाले, यादव यांचा हा निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्यावर आधारित होता. आयोग आपले काम करताना कुणालाही घाबरत नाही. आयोग पक्षपाती नाही. यादव यांना पदावरून हटवण्याची भाजपाची मागणी अनुचित आहे. पत्रपरिषदेला संपत यांच्यासोबत अन्य दोन्ही निवडणूक आयुक्त हजर होते. आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करणार्या भाजपाला ठणकावताना संपत म्हणाले, त्यांनी काही गंभीर आणि निराधार आरोप केले आहेत. राजकीय पक्षांनी अधिक परिपक्वता दाखवायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला. संबंधित स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी आणि त्यांच्या चमूने सुरक्षेशी निगडित असलेल्या व्यावसायिकांच्या सल्ल्यावर विचार केल्यानंतरच हा निर्णय घेतला होता आणि आयोगाने हा निर्णय बदलण्याची अजिबात आवश्यकता नव्हती, असे संपत म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भाजपा व अन्य पक्षांनी काही निवडणूक अधिकार्यांची बदली करण्याची मागणी केली आहे. त्याकडे लक्ष वेधले असता संपत म्हणाले, अशा लहानसहान तक्रारींच्या आधारावर आम्ही अधिकार्यांची बदली करीत नसतो. आम्ही आमच्या पातळीवर अशा तक्रारींचा तपास करतो आणि तक्रार खरी असेल तरच अधिकार्यांची बदली करतो.