वारांगनांच्या पुनर्वसनासाठी आयोग हवा
By admin | Published: February 5, 2015 01:12 AM2015-02-05T01:12:50+5:302015-02-05T01:12:50+5:30
कुठलीही महिला स्वत:च्या मर्जीने नव्हे तर परिस्थितीमुळे वारांगना बनते. या वारांगनांचा व्यवसाय जर हिरावून घेतला जात असेल तर त्यांचे पुनर्वसन करणे ही शासनाची जबाबदारी आहे.
उमेश चौबे : ‘आक्रोश’ सभेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला धीर
नागपूर : कुठलीही महिला स्वत:च्या मर्जीने नव्हे तर परिस्थितीमुळे वारांगना बनते. या वारांगनांचा व्यवसाय जर हिरावून घेतला जात असेल तर त्यांचे पुनर्वसन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. वारांगनांच्या पुनर्वसनासाठी आयोग स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांनी केले. गंगाजमुनातील वेश्याव्यवसाय पोलिसांनी बंद केला आहे. त्यामुळे येथील महिलांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कारवाईचा निषेध म्हणून बुधवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेसाठी माजी खासदार जांबुवंतराव धोटे, उत्तर प्रदेशचे माजी राज्यमंत्री युवराज निकोसे, माजी पोलीस सहआयुक्त बाबासाहेब कंगाले, माजी पोलीस अधिकारी हरीसिंग साबळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष नूतन रेवतकर, डॉ. नयना धवड, अरुणा सबाने, दीपक निलावार, मधुकर कुकडे, सुनील चाखोरे, उत्तमबाबा सेनापती हे प्रामुख्याने उपस्थित होते.
संविधानानुसार प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा हक्क आहे. त्यामुळे वारांगना कुठलेही बेकायदेशीर काम करत नाही. परंतु ‘पीटा’ नियमांतील अटींचे पालन करणे त्यांना आवश्यक आहे, असे मत बाबासाहेब कंगाले यांनी व्यक्त केले. वारांगनांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील या शब्दांत साबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वारांगनांना परवाने देण्यात यावे तसेच त्यांना पेन्शन देखील असावी. वारांगनांच्या कुटुंबांना सरकारने पोसायला हवे, अशी मागणी डॉ.धवड यांनी केली.
यावेळी जांबुवंतराव धोटे, नूतन रेवतकर, अरुणा सबाने यांनीदेखील वारांगनांच्या समर्थनार्थ भाषण केले. सभेचे संचालन नरेंद्र पालांदूरकर यांनी केले. यावेळी सुमारे ४०० वारांगना सभागृहात एकत्र आल्या होत्या. (प्रतिनिधी)
सीताबर्डी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने
दरम्यान, आक्रोश सभेनंतर झाशी राणी चौकात सामाजिक कार्यकर्ते व वारांगना एकत्र झाले व तेथे छोटेखानी सभा घेण्यात आली. नंतर व्हेरायटी चौकात सर्व जण एकत्र आले व सीताबर्डी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली.