कोरेगाव भीमा प्रकरणी आयोगाकडून कामाला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 07:46 PM2018-10-03T19:46:03+5:302018-10-03T19:54:32+5:30
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाच्या कामकाजाला बुधवारी पुण्यात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी केवळ एका व्यक्तीची साक्ष नोंदवून घेण्यात आली.
पुणे : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाच्या कामकाजाला बुधवारी पुण्यात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी केवळ एका व्यक्तीची साक्ष नोंदवून घेण्यात आली. आयोगाकडून येत्या ६ आॅक्टोबरपर्यंत १७ व्यक्तींची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र, त्यास जास्त अवधी लागत असल्याने या कामकाजास मुदतवाढ देण्याची शक्यता आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग कोरेगाव भिमा प्रकरणी चौकशी करत आहे. आयोगाने मे महिन्यात कोरेगाव भिमा,पेरणे फाटा, वढू-बुद्रुक, सणसवाडी येथील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला होता. तसेच विहित मुदतीत सर्वसामान्य नागरिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या माध्यमातून अर्ज मागवले होते. प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली असून त्यातील १७ व्यक्तींची साक्ष ३ ते ६ सप्टेबर या कालावधीत नोंदविली जाणार असल्याचे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच त्यासंदर्भातील वेळापत्रकही तयार करण्यात आले होते. त्यानुसार जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये आयोगाला उपलब्ध करून दिलेल्या कार्यालयात अर्ज/प्रतिज्ञापत्रांवर सुनावणी व साक्षी तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
आयोगातर्फे राजेंद्र गायकवाड, संभाजी शिवले, चंद्रकांत पाटील, प्रल्हाद गायकवाड, कृष्णा आरगडे, मुरलीधर देशमुख, रेखा शिवले, शांताराम भंडारे, सोनेश शिवले, शरद दाभाडे, ज्ञानेश्वर देशमुख यांच्यासह कोरेगाव भीमा ग्रामपंचायत सरपंच संगीता कांबळे, माजी उपसरपंच गणेश फडतरे, ग्रामपंचायत लिपिक सागर गव्हाणे, संतोष गायकवाड, बाळासाहेब मिसाळ-पाटील आणि सर्जेराव वाघमारे यांची साक्ष नोदविली जाणार आहे.
दरम्यान, बुधवारी आयोगासमोर चंद्रकांत पाटील यांची साक्ष नोंदवून घेण्याचे काम सुरू होते. मात्र, बुधवारी कार्यालयीन वेळेत आयोगाचे कामकाज सुरू होते. पाटील यांनी आयोगासमोर इतिहास कालीन माहिती सांगितल्याचे समजते.