नालेसफाई ‘पर्यटन’ दौऱ्यावर आयुक्त नाराज
By admin | Published: June 11, 2016 02:00 AM2016-06-11T02:00:16+5:302016-06-11T02:00:16+5:30
आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने विरोधकांनी नालेसफाईचे बिंग फोडून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे ठरविले
मुंबई : आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने विरोधकांनी नालेसफाईचे बिंग फोडून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे ठरविले आहे़ तर आपल्या बचावासाठी सत्ताधारी शिवसेना व भाजपा नेत्यांमध्येही नाल्यांच्या पाहणीची चढाओढ सुरू आहे़ मात्र राजकीय नेत्यांच्या नालेसफाईच्या या सहलींनी आयुक्त चांगलेच भडकले आहेत़ त्यामुळे उठसूट कोणाच्याही दौऱ्याला हजेरी लावू नका, अशी ताकीदच त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिली आहे़
३१ मे रोजी नालेसफाईच्या कामाची डेडलाइन संपली़ तरीही अनेक भागांमध्ये नाल्यांमध्ये अद्याप गाळ पडून आहे़ यामुळे मुंबई तुंबणार, अशी भीती विरोधी पक्षासह सत्ताधाऱ्यांनीही व्यक्त केली आहे़ त्यानंतरही या नालेसफाईच्या कामाच्या पाहणीचे दौऱ्यांवर दौरे सुरू आहेत़ विविध समित्यांचे अध्यक्ष, नेते, गटनेते नालेसफाईच्या दौऱ्यावर निघत असल्याने अधिकाऱ्यांनाही त्यांच्या मागून धावावे लागते़ मात्र यामध्ये बराच वेळ वाया जात असल्याने मान्सूनपूर्व कामांच्या तयारीवर याचा परिणाम होत आहे़ गेल्या काही दिवसांमध्ये या दौऱ्यांनी रेकॉर्ड केला आहे़ त्यामुळे अशा दौऱ्यांना हजर राहण्यापूर्वी परवानगी घेण्याची सक्ती आयुक्त अजय मेहता यांनी केली आहे़ पूर्वपरवानगीशिवाय दौऱ्याला जाणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईचे संकेत दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे़ (प्रतिनिधी)