आयुक्त रस्त्यावर, अधिकारी मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2016 06:03 AM2016-10-18T06:03:05+5:302016-10-18T06:07:42+5:30
मुदत संपली तरी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने धास्तावलेले अधिकारी सोमवारी रस्त्यावर उतरले
मुंबई : मुदत संपली तरी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने धास्तावलेले अधिकारी सोमवारी रस्त्यावर उतरले तर अविश्वास ठरावाची टांगती तलवार असल्याने आयुक्त अजय मेहता स्वत:ही नवीन रस्त्यांच्या पाहणीसाठी उन्हातान्हात फिरत होते. त्याच वेळी जी उत्तर विभागातील सर्व अभियंते व कर्मचारी ‘आॅन ड्युटी’ क्रिकेटचे सामने खेळायला गेले होते. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यामुळे आयुक्तांनी अखेर या प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपायुक्तांना दिले आहेत.
पावसाळा संपल्यानंतरही मुंबईतील रस्ते खड्ड्यांत आहेत. त्यावर मनसेचे आंदोलन, अभियंत्यांचा असहकार अशा घटनांनंतर राजकीय वातावरण तापले. त्यामुळे खड्डेप्रकरणी आयुक्तांवर अविश्वास ठरावच आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या. याची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी खड्डे बुजविण्यासाठी अधिकाऱ्यांना ४८ तासांची मुदत दिली. ही मुदत सोमवारी संपुष्टात येत असली तरी अनेक ठिकाणी अद्याप खड्डे कायम आहेत. त्यामुळे रस्ते व वॉर्डातील अधिकारी रस्त्यावर उतरून खड्ड्यांची पाहणी करताना दिसले. सोमवारपासून नव्याने सुरू होत असलेल्या शंभर रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यासाठी आयुक्तही स्वत: रस्त्यावर उतरले. मात्र जी उत्तर विभागातील सहायक आयुक्त, अभियंता व कर्मचारी त्याचवेळी दादर येथील अॅन्टोनिओ डिसिल्व्हा शाळेत क्रिकेटचे सामने खेळण्यात मश्गुल होते. हे सामने दरवर्षी होत असले तरी या वर्षी आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांनी खड्डे बुजविण्यास प्राधान्य देणे आवश्यक होते. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राजकीय पक्षांकडून होत आहे.
खड्डे बुजविण्यास मनसे मुदतवाढ
खड्डे बुजविण्याचे काम ४८ तासांमध्ये होणे शक्य नाही. दिवाळीपर्यंत खड्डे बुजविण्याची मुदत महापालिकेला दिली आहे. त्यानंतरही मुंबई खड्ड्यात असल्यास पूर्वी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आयुक्तांनाच खड्ड्यात उभे करू, असा इशारा मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. प्रमुख अभियंत्यांना खड्ड्यात उभे केल्यामुळे अधिकाऱ्यांना लाज वाटली होती. मग आता खड्डे बुजविण्याचे सोडून क्रिकेट खेळताना त्यांना लाज वाटत नाही का? या प्रकरणी संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
चौकशीचे आदेश
आयुक्तांचे आदेश डावलून क्रिकेट खेळणाऱ्या अधिकाऱ्यांनी पालिकेचा नियमभंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. आयुक्तांनीही या प्रकरणी उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या अहवालानंतर आॅन ड्युटी क्रिकेट खेळणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
राजीनाम्याची मागणी
मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी १७ आॅक्टोबरपर्यंत मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील, असे आश्वासन दिले होते. खड्डे बुजविण्याची महापालिकेचीच डेडलाइन संपली, तरी खड्डे मात्र तसेच आहेत. त्यामुळे आयुक्तांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी केली. रस्ते घोटाळ्याला जबाबदार असणारे शिवसेना व भाजपाचे नेते, पालिका अभियंते, ठेकेदार आणि आयुक्त यांना अटक करावी, अशी मागणीही निरुपम यांनी केली. (प्रतिनिधी)
>आयुक्तांकडून पाहणी
आयुक्तांनी पश्चिम उपनगरांतील काही रस्त्यांची सोमवारी पाहणी केली. यात स्वामी विवेकानंद मार्गावरील वांद्रे फायर ब्रिगेडशेजारील रस्ता, प. द्रुतगती महामार्गाला जोडणारा विलेपार्ले पूर्व येथील श्रद्धानंद मार्ग, अंधेरी पूर्वेकडील गोखले पुलापर्यंतचा ना.सी. फडके मार्ग आणि अंधेरी पूर्वेकडील अच्युतराव पटवर्धन मार्ग यांचा समावेश आहे.