व्हॉट्सअॅपवर आयुक्तांची शाळा
By admin | Published: January 29, 2015 05:42 AM2015-01-29T05:42:05+5:302015-01-29T05:42:05+5:30
महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक विभागाला लक्ष्यपूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत
ठाणे : महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक विभागाला लक्ष्यपूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, रोज हे लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण केले जात आहे, त्यासाठी काय काय उपाय योजले जात आहेत, याची सर्व माहिती ते प्रत्येक
मिनिटाला मिळवण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअॅपचा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे पहाटे ५पासून प्रत्येक विभागाच्या प्रमुखांकडून अपडेट घेतले जात आहे.
ठाणे महापालिकेची आर्थिक घडी बिघडल्याने पालिकेच्या तिजोरीत कर्मचाऱ्यांचा पगार निघेल एवढीच रक्कम शिल्लक असल्याची माहिती आयुक्त जयस्वाल यांना पालिका अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी दिली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्काच होता. परंतु, आता त्यांनी ही विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी प्रत्येक विभागाची शाळा घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी व्हॉट्सअॅपवर ‘टीएमसी एमसीस आॅफिस’ हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपचे अॅडमिन उपायुक्त संदीप माळवी जरी असले तरी संपूर्ण ग्रुपवर आयुक्तांचा ताबा आहे.
या ग्रुपवर पहाटे ५ वाजल्यापासून मेसेज धडकत असून आज कोणत्या विभागाने किती वसुली केली, वसुली का झाली नाही, किती दिवसात वसुली पूर्ण केली जाणार आहे, शहरातील कचऱ्याचा प्रश्न, टीएमटीच्या रोज किती बस रस्त्यावर धावतात, उत्पन्न किती, प्रवासी किती, याची माहितीही एका मेसेजवर आयुक्तांना उपलब्ध होत आहे. त्यामुळे कोणता विभाग कशात पिछाडीवर आहे आणि कोणता विभाग आघाडीवर आहे, याची माहिती तत्काळ उपलब्ध होत आहे. यामुळे पहाटेपासूनच पालिकेच्या प्रमुख विभागांचे अधिकारी कामाला लागत असून आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांना
प्रत्येक क्षणाला तत्पर राहावे लागत आहे. आयुक्तांच्या या वेगळ्या निर्णयामुळे पालिकेतील झोपी गेलेले सर्वच विभाग आता जागे झाले असून ते कामाला लागले आहेत. (प्रतिनिधी)