कॉन्स्टेबल छळप्रकरणी आयुक्तांचे चौकशीचे आदेश
By admin | Published: December 19, 2015 02:19 AM2015-12-19T02:19:19+5:302015-12-19T02:19:19+5:30
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला कॉन्स्टेबल धनश्री पेडणेकर यांच्या अन्याय व मानसिक छळप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिले आहेत.
मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला कॉन्स्टेबल धनश्री पेडणेकर यांच्या अन्याय व मानसिक छळप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिले आहेत. या प्रकरणी संबंधितांवर योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही जावेद यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
ताडदेव पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल पेडणेकर यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबतचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याबाबत आयुक्त अहमद जावेद यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘सध्या आपण एका राष्ट्रीय परिषदेनिमित्त गुजरातमध्ये आहोत. हा प्रकार गंभीर असल्याने त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी मुंबईला परतल्यानंतर त्याचा आढावा घेऊन संबंधितांवर योग्य कार्यवाही केली जाईल’, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ म्हणाल्या, ‘महिला कॉन्स्टेबलवरील अन्यायाप्रकरणी आयुक्त जावेद यांच्याशी चर्चा केली आहे. सोमवारी त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार आहे. महिला आयोगामार्फत या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. मध्य विभागाचे अप्पर आयुक्त शिंदे व उपायुक्त जयकुमार यांनी ताडदेव पोलीस ठाण्याला भेट देऊन वरिष्ठ निरीक्षकांना त्याबाबत जाब विचारला आहे. दोन तास ते पोलीस ठाण्यात थांबून होते. पोलीस ठाण्याकडून आलेल्या अहवालानुसार कारवाई केल्याचे त्यांना सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महिला आयोगानेही दखल
महिला आयोगामार्फत या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब घेतले जातील. - चित्रा वाघ
सदस्या महिला आयोग
- ताडदेव पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल पेडणेकर यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबतचे शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त.