आयुकाच्या शास्त्रज्ञांनी लावला दीर्घिकेचा शोध; ९.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 03:06 AM2020-08-25T03:06:31+5:302020-08-25T03:06:42+5:30
उच्चस्तरीय अतिनील किरणे नोंदविली
पुणे: भारताच्या पहिल्या बहू-तरंगलांबी अॅस्ट्रोसॅट उपग्रहाने ९.३ अब्ज प्रकाशवर्ष दूर असलेल्या एआय डीएफएसओ १ या दीर्घिकेतील उच्चस्तरीय अतिनील किरणे नोंदविली आहेत. कॉस्मिक कृष्णयुगानंतर जन्मास येणाऱ्या आयनीभवनावर आधारित विश्वाची निर्मिती करण्यामध्ये या अतिनील किरणांची महत्त्वाची भूमिका आहे.
द इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रॉनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) येथील सहयोगी प्राध्यापक कनक साहा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हा शोध लावला आहे. त्यात भारत, स्वीत्झर्लंड, फ्रान्स, अमेरिका, जपान या देशातील वैज्ञानिकांचा समावेश आहे. नेचर अॅस्ट्रोनॉमी या नियतकालिकामध्ये २४ आॅगस्ट रोजी हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
संशोधन गटाने आॅक्टोबर २०१६ मध्ये हबल एस्कट्रीम डीपफिल्डमध्ये असलेल्या दीर्घिकेकडे इस्त्रोच्या अॅस्ट्रोसॅटच्या सहाय्याने दोन तासांमध्ये अधिक जास्त काळ निरीक्षणे नोंदवली. परंतु, त्यानंतर उत्सर्जन खरोखरच हे त्या दीर्घिकेकडून होत आहे हे निश्चित करण्यासाठी उपलब्ध डेटाचे विश्लेषण करण्यासाठी दोन वर्षे लागली. अतिनील किरणे पृथ्वीच्या वातावरणाद्वारे शोषली जात असल्याने त्यांचा अभ्यास अवकाशातून केला जातो. यापूर्वी अॅस्ट्रोसॅटच्या यूव्हीआयटीपेक्षा मोठी असलेल्या नासाच्या हबल अवकाश दुर्बिणीला सुद्धा या दीर्घिकेमधून उत्सर्जित असे अतिनील उत्सर्जन टिपता आले नाही.
आयुकाचे संचालक डॉ. शोमक रायचौधरी म्हणाले की, विश्वाचे अंधकारमय युग संपून प्रकाशाचे आगमन कसे झाले, याबद्दल हे संशोधन एक महत्त्वाचे पुरावे देते. प्रकाशाच्या सर्वात पहिल्या स्रोतांचा शोध लावणे कठिण काम आहे.
आयनीभवन म्हणजे काय?
महास्फोटानंतर (बिग बँग) विश्व हे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स व इलेक्ट्रॉन्स यांच्या प्रवाही मिश्रणासमान होते. ते थंड होऊ लागले तसे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स व इलेक्ट्रॉन्स यांचे एकत्रिकरण होऊन हायड्रोजनच्या आयनीभवन झालेल्या अणूंमध्ये रूपांतरीत होऊ लागले. आयनीभवन झालेल्या हायड्रोजन आणि हिलियम अणूंकडे इलेक्ट्रॉन आकर्षिले जातात आणि ते निष्क्रिय अणूंमध्ये परिवर्तित होतात. यामुळे सर्वात पहिल्यांदा प्रकाशाचे सर्वच विखुरणे शक्य झाले. विश्वाच्या त्या कालखंडात तारे आणि दीर्घिका नव्हत्या. ते संपूर्णरित्या अंधारलेले होते. यानंतर कदाचित काही दशलक्ष वर्षांनी सर्वप्रथम तारे व दीर्घिकांची निर्मिती झाली आणि अंधारयुगाचा अंत झाला.