बांधिलकी जपणारा माणूस!

By admin | Published: May 27, 2017 06:19 AM2017-05-27T06:19:30+5:302017-05-27T06:19:30+5:30

नितीन गडकरी हा एक वेगळा माणूस आहे. भाजपात ते अनेक वर्षांपासून आहेत. मंत्रिमंडळात काम करणाऱ्यावरच खरी जबाबदारी असते. त्याला अनेक गोष्टी पार पाडाव्या लागतात.

Commitment man! | बांधिलकी जपणारा माणूस!

बांधिलकी जपणारा माणूस!

Next

- मनोहर जोशी
नितीन गडकरी हा एक वेगळा माणूस आहे. भाजपात ते अनेक वर्षांपासून आहेत. मंत्रिमंडळात काम करणाऱ्यावरच खरी जबाबदारी असते. त्याला अनेक गोष्टी पार पाडाव्या लागतात. माझ्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी म्हणजे जबाबदारीने वागणारा, उत्साहाने वागणारा, काहीतरी घडवू पाहणारा असे व्यक्तिमत्त्व होते. खरे सांगायचे, तर हे मंत्रिपद म्हणजे तारेवरची कसरतच असते. फार थोडे मंत्री हे काहीतरी घडवायला उत्सुक असतात. त्यासाठीच ते या मार्गावर आलेले असतात. उरलेले बहुतांश तर या मंत्रिपदामुळे मिळणाऱ्या सोईसुविधा मिळाव्यात, ती सत्ता अनुभवता यावी, म्हणूनच झटत असतात. गडकरी मात्र, काहीतरी घडवू पाहणाऱ्या गटातील होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो.
गडकरी आणि मला जवळ आणणारा एक विषय म्हणजे मुंबई-पुणे रस्ता. अशा प्रकारचा रस्ता व्हावा, ही माझीही मुख्यमंत्री म्हणून इच्छा होती. आपल्या व्यवस्थेत अनेक विषयाचे अंतिम अधिकार हे मुख्यमंत्र्याकडे असतात. तसे तो विषय माझ्याकडेही होता. गडकरी त्या खात्याचे प्रमुख होते. सार्वजनिक बांधकाम खाते त्यांच्याकडे होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीत गडकरी यांच्याविरोधात माझ्याकडे एकही तक्रार आली नाही. एरव्ही अशा प्रकारचे खाते असेल, तर तक्रारींचा ओघच सुरू असतो, पण गडकरींबाबत असे घडले नाही. त्यांना अशा गोष्टीत रसच नव्हता. त्यांच्यात एक बांधिलकी होती. ते संघाचे आहेत. संघ बांधिलकी जपणाऱ्यांची संघटना आहे. ही बांधिलकी गडकरींमध्येही पाहायला मिळते.
जेव्हा मुंबई-पुणे महामार्ग पूर्ण होत आला, तेव्हा मात्र, एका वेगळ्याच विषयाची चर्चा सुरू झाली. ती म्हणजे, हा महामार्ग नेमका कोणाचा? पत्रकारांनीही त्या वेळी या विषयाला महत्त्व दिले आणि त्याची चर्चा घडविली. त्या वेळी गडकरी यांनीच एका पत्रकाराला सांगितले की, ‘जर मुख्यमंत्री माझ्याबरोबर नसते, तर इतक्या झपाट्याने हा रस्ता झालाच नसता.’ हे गडकरी यांचे शब्द आहेत. सरकारमध्येही अनेक बंधन असतात. कसरत करावी लागते. मंत्री आणि मित्र अशा दोन्ही भूमिका आणि व्यक्तिमत्त्व मला गडकरी यांच्यामध्ये आढळले. मुंबई-पुणे रस्त्याच्या निमित्ताने पुढे अनेकांनी आमच्यात अंतर आणायचा अनेक लोकांनी प्रयत्न केला, पण गडकरी आणि माझ्यात त्यामुळे दुरावा निर्माण झाला नाही.
तेव्हापेक्षा आता गडकरी यांचे स्थान मोठे आहे. त्यांचा परीघ वाढला आहे. पूर्वीपेक्षा ते आता अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. मीही केंद्रात मंत्री होतो. नितीन गडकरी यांनी त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी मला संधी द्यावी, अशी माझी इच्छा आहे.

Web Title: Commitment man!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.