राज्याचा सर्वांगीण विकास व नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 05:35 AM2024-08-16T05:35:00+5:302024-08-16T05:35:01+5:30

स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

Committed to overall development of the state and welfare of citizens; Chief Minister Eknath Shinde | राज्याचा सर्वांगीण विकास व नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचा सर्वांगीण विकास व नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याचा सर्वांगीण विकास व नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम सुरू असून, विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांच्यासह सैन्य दलाचे अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक आणि इतर विभागांचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत राज्य शासनाने भरीव कामगिरी केली आहे. विदेशी गुंतवणूक, समाजातील दुर्बल, गोरगरीबांसाठी आखलेल्या नाविन्यपूर्ण योजना या माध्यमातून नागरिकांप्रती असणारी बांधिलकी दाखवून दिली आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवून जगातली तिसरी अर्थव्यवस्था होण्यासाठी आगेकूच सुरू आहे. त्यामध्ये आपल्या राज्याचा वाटा मोठा असणार आहे. राज्याची वाटचाल त्या दिशेने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

परदेशी पर्यटकांची पसंती महाराष्ट्राला

राज्यातील गुंतवणूकदार, उद्योजक किंवा सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम राज्य शासनाने केले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कृषी, शिक्षण, ऊर्जा, निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, पर्यटन, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये आपण आमूलाग्र क्रांती आणत आहोत. राज्यात दीड कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट्य आपण ठेवले आहे. राज्याची लॉजिस्टिक पॉलिसी जाहीर केली आहे. यातून येत्या पाच वर्षांत ३० हजार कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळणार आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने राज्यात गुंतवणुकीचा वेग वाढला आहे.

गेल्या दोन वर्षांत ५ लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी करार झाले आहेत. थेट परकीय गुंतवणुकीत तर आपण देशात प्रथम आहोत. देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १४ टक्के आहे. उद्योगात आणि सेवा क्षेत्रात आपले राज्य क्रमांक एकवर आहे. विदेशी पर्यटकांची पसंतीही महाराष्ट्र असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

Web Title: Committed to overall development of the state and welfare of citizens; Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.