संमेलनात ग्रंथ प्रदर्शनासाठी समिती
By admin | Published: September 26, 2016 02:51 AM2016-09-26T02:51:32+5:302016-09-26T02:51:32+5:30
साहित्य संमेलन आणि वाद या समीकरणाला छेद देण्यासाठी यंदा अत्यंत साधेपणाने संमेलनाचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबई : साहित्य संमेलन आणि वाद या समीकरणाला छेद देण्यासाठी यंदा अत्यंत साधेपणाने संमेलनाचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. डोंबिवली या ठिकाणी संमेलन स्थळ निश्चिती झाल्यानंतर, आता संमेलनाध्यक्ष, ग्रंथप्रदर्शन अशा सर्व तयारींना सुरुवात झाली आहे. संमेलनातील ग्रंथप्रदर्शन व विक्रीवर होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी, यंदा प्रथमच ग्रंथ प्रदर्शनासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे.
संमेलनस्थळी भरणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनाचा यथायोग्य समन्वय साधण्यासाठी महामंडळाने समिती अंतर्गत या कामाची जबाबदारी सोपविली आहे. त्या समितीत रवींद्र बेडकीहाळ (पुणे), आसाराम लोमटे (मराठवाडा) आणि चंद्रशेखर गोखले (मुंबई) या सदस्यांचा समावेश आहे. ही समिती संमेलन आयोजक, महामंडळ व ग्रंथ व्यावसायिक यांच्या योग्य समन्वय, संवाद व सौहार्द राखण्याचे काम करेल.
संमेलनप्रसंगी आयोजित होणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनाची जबाबदारी निमंत्रक संस्थेची म्हणजेच, आगरी युथ फोरम यांची असणार आहे. या निमंत्रक संस्थेला ही समिती सहयोग करेल.
यंदाच्या संमेलनात दर्शनी, प्रदर्शनात्मक, सादरीकरणात्मक व मुद्रित, दृकश्राव्य वा अन्य कोणत्याही माध्यमातील प्रसिद्धी, प्रचार व निवेदन इ. प्रकारच्या सामुग्रीतून कोणताही केवळ व्यक्तिगत प्रचार प्रसार न घडता, संमेलनाचा दर्जा, गुणवत्ता यांची काळजी घेतली जाईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)