महाड दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2016 04:51 AM2016-10-04T04:51:49+5:302016-10-04T04:51:49+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदी पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदी पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस.के. शहा यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात येणार आहे.
अतिवृष्टीमुळे २ आॅगस्टच्या रात्री महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत दोन एसटी बस गाड्या आणि काही खासगी बस वाहून गेल्याने ४२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
आतापर्यंत २६ जणांचे मृतदेह सापडले असून अद्याप १६ जणांचा ठावठिकाणा लागलेला नाही. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच ही दुर्घटना घडली होती. तेव्हा विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.
विधिमंडळातील या आश्वासनानुसार एस.के. शहा यांच्या समितीची स्थापना करण्यात आली असून सहा महिन्यांत या समितीने आपला अहवाल सादर करावा, असा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच जारी केला आहे. कमिशन आॅफ इन्क्वायरी अॅक्ट १९५२ च्या तरतुदीनुसार या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
सावित्री नदीवरील पूल वाहून जाण्यास कारणीभूत झालेली परिस्थिती व त्यावरील वाहने वाहून जाण्यास कारणीभूत परिस्थिती व घटनांचा क्रम लावणे, पूल वाहून जाण्यामागे नैसर्गिक कारणे होती की मानवी चुकांमुळे ही दुर्घटना घडली याची पडताळणी करणे, पूल वाहून जाण्यामागे तांत्रिक तपासणी अधिकारी जबाबदारी असल्यास त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे तसेच भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी राज्य शासनाला कायमस्वरूपी करावयाच्या उपाययोजना सुचविणे तसेच त्याअनुषंगाने शिफारसी करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)