औषध खरेदीसाठी दीक्षितांची समिती
By admin | Published: April 18, 2017 06:07 AM2017-04-18T06:07:10+5:302017-04-18T06:07:10+5:30
औषध खरेदीत होणारे घोटाळे टाळण्यासाठी आणि या व्यवस्थेत संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी माजी पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती
अतुल कुलकर्णी, मुंबई
औषध खरेदीत होणारे घोटाळे टाळण्यासाठी आणि या व्यवस्थेत संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी माजी पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून यापुढे वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व औषध खरेदी या समितीमार्फतच केली जाणार आहे. या नेमणुकीबाबतचे वृत्त सगळ्यात आधी ‘लोकमत’ने दिले होते.
या समितीच्या सदस्यपदी मुंबई महानगर रुग्णालयांचे निवृत्त संचालक डॉ. संजय ओक आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे निवृत्त माजी सहाय्यक संचालक डॉ. सुरेश सरवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. मात्र २९७ कोटींच्या औषध खरेदीत घोटाळे झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक आरोग्य विभागात दोन संचालक नेमण्याचे आदेश देऊनही तीन ते चार महिने झाले तरीही आरोग्य विभाग मात्र ही फाईल पुढे जाऊ देत नाही. त्याउलट माजी पोलिस महासंचालकांना या पदावर नेमण्याची ही राज्यातली पहिलीच घटना आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालये, संलग्नित रुग्णालये व आरोग्य पथकांकरिता यंत्रसामुग्री, औषधे व शल्योपचार सामुग्री (सर्जीकल साहित्य) खरेदी करण्यासाठी यापुढे ही राज्यस्तरीय खरेदी समिती काम करेल. या समितीने वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत लागणारी सामुग्री खरेदीसाठीची ई-निविदा प्रक्रिया राबविण्याच्या प्रक्रियेपासून संबंधीत खरेदीचा अंतिम निर्णय घेण्यापर्यंतची सर्व कार्यवाही पार पाडण्याचे अधिकारही याच समितीला देण्यात आले आहेत.
यापूर्वी १५ मार्च २००० ते १७ मार्च २०१७ या कालावधीत काढण्यात आलेल्या सर्व आदेशांऐवजी आज १७ एप्रिल २०१७ रोजी काढण्यात आलेला आदेश यापुढे लागू राहील. ही राज्यस्तरीय खरेदी समिती नऊ सदस्यांची असेल. ज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक हे सदस्य सचिव असतील तर लेखा व कोषागार कार्यालयाने नामनिर्देशित केलेला संचालक दर्जाचा प्रतिनिधी, उद्योग सह संचालक, आरोग्य सवा संचालनालयाचा गट अ दर्जापेक्षा कमी नसलेला ज्येष्ठ अधिकारी आणि सहयोगी प्राध्यापक असे तिघे निमंत्रित सदस्य असतील.